
संगमेश्वर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परचुरी गावात लोकशाहीप्रती जागरूकतेचे प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. परचुरी येथील प्रियंका भार्गव वेल्ये हिचा विवाह रुपेश खाडे यांच्याशी संपन्न झाला. विवाह सोहळा झाल्यानंतर नववधू प्रियंका वेल्ये हिने थेट मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क बजावला.
परचुरी शाळा क्रमांक ३ येथील मतदान केंद्रावर जाऊन तिने मतदान केले. लग्नाच्या आनंदातही लोकशाहीतील आपले कर्तव्य विसरू नये, असा संदेश प्रियंकाने दिला आहे. तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. लग्नाच्या दिवशीही मतदानाला प्राधान्य देत तिने लोकशाहीप्रती जबाबदारीचे भान जपल्याने नागरिकांनी तिच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. हा प्रसंग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन देणारा ठरला असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचा संदेश देणारा आहे.






























































