परभणीत किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात एकूण १७ उमेदवार आपले नशीब आजमात असून या १७ उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. जिल्ह्यात २ हजार १७४ मतदान केंद्रावर गुरुवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रीया पार पडली. दरम्यान, मानवत तालुक्यातील शेवडी ही गालबोट लावणारी वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यात ५५.१३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. जिंतूर-५७.०१, परभणी ५४.३५, गंगाखेड-५५.२०, पाथरी-५४.६ परतूर व घनसावंगी ५५ टक्के मतदान ५ वाजेपर्यंत झाले होते. मतदान प्रक्रीयेस सकाळी ७ वाजता शांततेत सुरुवात झाली.

शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी शारदा महाविद्यालयात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी सोनपेठ तालुक्यातील विटा या त्यांच्या मुळगावी आपल्या कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला. परभणी शहरातील एकता नगरात वनामकृविचे कुलगुरू अशोक ढवण यांनीही सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी शहरातील मराठवाडा हायस्कूनल येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे अनेक मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले असल्याच चित्र पहावयास मिळाले. यात अपंगांसाठी व्हिलचेअर, उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्र परिसरात टेंट उभारणी करण्यात आली होती. अनेक मतदान केंद्राबाहेर मतदार सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात आले होते. या ठिकाणी मतदारांना मतदानासाठी सहाय्य केले जात होते. नव मतदारांनी प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा आनंद लुटला.

परभणी शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपआपल्या मतदान केंद्रांवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात ही निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली असून संपूर्ण जिल्ह्यात मतदार जागृती अभियान राबविल्यामुळे मतदानाच्या टक्केवारी भर पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने चर्चेद्वारे हा प्रश्न निकाली काढूनही जिल्ह्यात काही मतदान केंद्रांवर बहिष्कार टाकला असल्याचे समोर आले आहे. परभणी लोकसभा मतदार संघात १७ उमेदवारांसाठी मतदारांनी रखरखत्या उन्हात दाखविलेला उत्साह वैशिष्ट्येपूर्ण आहे. वृद्ध, अपंग, महिला यांचा उत्साह वाखण्याजोगा होता. काहींनी सकाळी ७ वाजेपासूनच मतदान केंद्राची वाट धरली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मतदान प्रक्रीयेदरम्यान, कोण लिड घेणार याचर्चांना वाव मिळाला होता. महायुतीचे उमेदवार तथा खासदार संजय जाधव हे आपला बालेकिल्ला अभेद्द ठेवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर भेटी देऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले होते.