माणदेशी डाळिंबाला अतिपावसाचा तडाखा, डाळिंब उत्पादकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळी आटपाडी तालुक्यात यंदा पावसाने कहर केला आहे. सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस झाल्याने डाळिंबाच्या 75 टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या असून, काढणीला आलेल्या फळांना करपा आणि फळकूज रोगाने थैमान घातले आहे. यामुळे डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसला असून, कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्याचे हुकमी फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱया डाळिंबाच्या पिकाला सातत्याने संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कधी दुष्काळाचा फटका तर कधी तेल्या रोगाचे संकट बागांना झेलावे लागत आहे. सध्या अतिपावसामुळे हजारो एकर डाळिंबाचे क्षेत्र पाण्यात बुडाले आहे. यावर्षी सर्वाधिक विक्रमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तीन-चार महिन्यांपासून तालुक्यात सतत कमी-अधिक पाऊस पडत आहे. दोन महिन्यांपूर्वी सलग महिनाभर सूर्याचे दर्शन झाले नव्हते. तर, चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अवर्षणप्रवण असलेल्या आटपाडीला यावर्षी दोनवेळा अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात तालुक्यात सरासरी 300 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत 850 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने गावचे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले असून, रस्तेही वाहून गेले आहेत.

तालुक्यात सुमारे 15 ते 16 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब पिकाची लागवड केली जाते. त्यापैकी 75 टक्के बागांना अति पावसाचा फटका बसला आहे. डाळिंब उत्पादकांना कोटय़वधी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे.

पाऊस अन् आर्द्रतेचा फटका
डाळिंबाला जादा पाऊस आणि आर्द्रता चालत नाही. मात्र, यावर्षी आर्द्रता आणि पावसाने कहर केला आहे. सततचे ढगाळ हवामान आणि ज्यादा आर्द्रतेमुळे मोठी फूलगळ झाली. पाकळी करपा आणि फळकूज रोगाने थैमान घातले आहे. सततच्या पावसाने हजारो एकर बागा पाण्यात बुडाल्या आहेत. बागेत दोन फुटांपर्यंत पाणी साचून राहिले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. पाण्यामुळे मुळे कुजून पूर्ण बागा वाया जाणार आहेत.