
‘‘पूजा, तू राष्ट्रकुल मिळवलेले कास्यपदक आनंद साजरा करण्यासारखी बाब आहे, माफी मागण्याची नाही. तुझा जीवनाचा प्रवास आम्हाला प्रेरणा देतो. तुझ्या यशामुळे आम्हाला आनंद झाला आहे. भविष्यात तू देशासाठी आणखी चांगली कामगिरी करशील,’’ असे ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्णपदक न मिळवता आल्याने रडत देशवासीयांची माफी मागणारी महिला पैलवान पूजा गहलोतचे कौतुक केले आहे.
बर्मिंगहॅममध्ये 50 किलो वजनी गटात केवळ कास्यपदकच मिळवता आले म्हणून पूजाने पत्रकार परिषदेत अश्रुभरल्या डोळय़ाने देशवासीयांकडे माफी मागितली होती. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू पूजा गहलोतने 50 किलो वजनी गटात स्तुत्य खेळ केला. कुस्तीच्या उपांत्य फेरीत गहलोतने चांगला खेळ केला, पण तिला सामना जिंकता आला नाही. त्यामुळे तिला कास्यपदकावर समाधान मानावे लागल्याने तिने रडत सर्वांची माफी मागितली होती.





























































