दापोली तालूक्याच्या किनारपट्टी भागात रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे किनारपट्टी भागातील पर्यटन व्यवसायावर मोठाच परिणाम होत आहे. त्यामुळे शाश्वत रोजगार निर्मितीस खो बसत आहे. यासाठी एम.आय.डी.सी च्या धरतीवर पर्यटन व्यवसाय वृध्दीसाठी आणि त्यातुन होणाऱ्या रोजगार उपलब्धतेसाठी शासनाकडून ठोस उपाय योजनांचे काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील का ? की ज्यामुळे पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीस वाव मिळेल. अशाप्रकारची मागणी दापोली तालूक्यातील पर्यटन व्यवसायांकडून होत आहे.
दापोली तालूक्याला निसर्गतःच स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टीचे लेणं लाभलं. आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी समुद्राचे दर्शन होत नाही तेथील लोक पर्यटनासाठी दापोलीत येत असतात. अशा दापोली तालूक्यातील दाभोळ ते केळशी दरम्यानच्या किनारपट्टी भागातील रस्त्यांची खुपच दुरवस्था झालेली आहे. पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे महागडया किंमतीची वाहने घेवून पर्यटनासाठी येत असतात. आधीच असलेल्या निमुळत्या रस्त्यांच्या समस्येत रस्त्यांच्या दुरवस्थेने त्यात आणखीनच भर टाकली आहे. त्यात आणखीन कहर म्हणजे पर्यटन व्यवसाय भागातील सतत होणारा खंडीत विज पुरवठा. आधीच रस्त्यांच्या दुरवस्थेच्या तीव्र समस्येने डोके वर काढलेले असताना विजेच्या सततच्या खंडीत प्रकाराचा मोठाच फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. त्यामुळे दापोलीतीलच नव्हे तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारपट्टीत पर्यटन व्यवसाय चालतो त्या सर्वच ठिकाणी स्थानिकांना रोजगाराची उपलब्धता होते. त्याचप्रमाणे आंबा, काजू, त्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ, वाल, कडवा, चवळी, कुळीथ आदी कडधान्ये, स्वच्छ ताजे मासे, हंगामात उपलब्ध होणारा कोकणचा रानमेवा आदींसह मटण, चिकन, दुध, दही, ताक, शितपेय, पापड, लोणंच, कुरडया आदी व्यवसायांची वृध्दी होते.
कुशल आणि अकुशल कारागिर लोकांना आपल्या घरच्या घरी हाताला काम मिळते. त्यातून रोजगार निर्मिती होते. तसे येथे भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांमुळे पेट्रोल पंप चालकांच्या इंधनाची विक्री होते. असे अनेक व्यवसाय हे पर्यटनावर आधारीत आहेत त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या ठिकाणचे मुळात रस्ते सुधारले पाहीजेत. ही जशी समस्या निकाली निघाली पाहीजे तसे रोजगार निर्मिती उपलब्ध करून देणा-या पर्यटन व्यवसायाला बळकटी येण्यासाठी एम.आय.डी.सी.च्या धरतीवर शासनाने काही ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी औदयोगिक विकास महामंडळासारखे काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने रस्त्यांची सुधारणा, विणा खंडीत कायम सुरळीतपणे सुरू राहणारा विज पुरवठा, पाण्याची उपलब्धता आदींचा समावेश असायला पाहीजे तर आणि तरच येथील पर्यटन व्यवसायाला बळकटी मिळेल आणि त्यातून आणखीन रोजगार निर्मिती होईल.
शासनाची कोणत्याही प्रकारची मदत नसतानासुध्दा कोकणी लोकांनी आपल्या ईच्छाशक्तीच्या जोरावर पर्यटन व्यवसाय उभे केलेले आहेत. त्यातून मोठया प्रमाणात स्थानिकांच्या हाताला आपल्या गावातच काम मिळाले आहे.ही रोजगार निर्मिती पर्यटन व्यवसायातून झाली आहे. मात्र रस्ते, पाणी, नेटकनेक्टीव्हीटी, नेटवर्क, वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा आदी विविध समस्या पर्यटनाच्या मुळावर येत आहेत. त्यामुळे शासनाकडून ज्या प्रमाणे एम.आय.डी.सी. रोजगार उपलब्ध करण्यासाठी उभी केली जाते त्याच धरतीवर रोजगार उपलब्ध करणा-या पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेवून तेथील सोयी सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अज्ञानी वरवडेकर, ड्रिमलँड इन रिसाॅर्ट, मुरूड, ता. दापोली