
सामना ऑनलाईन । मुझ्झफरनगर
2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठय़ा संख्येने कोटय़ाधीश आणि अब्जाधीश उमेदवारांची नामावली समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यूपीतल्या मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले ऍड. मांगेराम हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणारे देशातील सर्वात गरीब उमेदवार ठरणार आहेत. मांगेराम यांनी 2000मध्ये सुमारे 1 हजार शेतमजूर आणि कष्टकऱयांना घेऊन मजदूर किसान युनियन नावाचा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून ते प्रत्येक लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि प्रत्येक निवडणुकीसाठी खर्च करीत अधिक गरीब होत आहेत. त्यांच्याकडे ना रोकड आहे ना बँक खात्यात जमा पुंजी. तरीही निवडणूक लढवण्याची जिद्द मात्र कायम आहे.
मांगेराम घरोघर पायी जाऊन आपला प्रचार करतात. घरी मोटरसायकल आहे. पण त्यात पेट्रोल भरायला पैसे नाहीत.

























































