माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींचा मार्ग मोकळा

प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) वापर व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. या समितीचा अहवाल अजूनपर्यंत सरकारला सादर झालेला नाही. त्यामुळे या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्याचे आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले. त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती घडवण्यात बंदी राहणार नाही.

पीओपीवरील बंदीमुळे हजारो गणेश आणि दुर्गा मूर्तीकार अडचणीत आले आहेत. या व्यवसायावर 5 लाखांहून अधिक कारागीर, मूर्तीकार, कारखानदारांचा रोजगार अवलंबून आहे. कोरोनामुळे हा उद्योग अडचणी आला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली होती.

महाराष्ट्रातील मूर्तीकार, कारागीरांचे गाऱ्हाणे पुन्हा आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याकडे मांडले. महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे याबाबत तोडगा काढावा अशी विनंती शेलार यांनी केली. जावडेकर यांनी ही विनंती मान्य करीत पीओपीवरील बंदी स्थगित करण्याचे आदेश दिले. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर,  महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघ अध्यक्ष जयेंद्र साळगावकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या