मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी…पोस्टाची ‘बाल जीवन विमा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी पोस्ट खात्याची एक खास योजना आहे. मुलांना केंद्रस्थानी ठेवून योजना सुरू करण्यात आली. ‘बाल जीवन विमा’ असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये छोटीशी गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवता येते.

अटी कोणत्या

नव्या योजनेंतर्गत 5 ते 20 वर्षांपर्यंतच्या मुलांचा जीवन विमा करता येतो. कोणताही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी विमा घेऊ शकतो. योजना घेताना पालकांचे वय 45 वर्षांपेक्षा कमी असावे. म्हणजे जर तुमचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही विमा काढू शकत नाही. पॉलिसी घेताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही. पॉलिसी स्वीकार झाल्यानंतर मुलांना संरक्षण मिळायला सुरुवात होते. पॉलिसी सुरू झाल्यानंतर आईवडिलांचा मृत्यू झाला तर  प्रीमियम भरावे लागणार नाही.

किती संरक्षण

यामध्ये जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक प्रीमियम पेमेंटचा पर्याय निवडू शकता. बाल जीवन विम्यामध्ये एक हजार रुपयांच्या विमा रकमेवर प्रति वर्ष 52 रुपये बोनस दिला जातो.

 जवळच्या पोस्ट ऑफिसमधून जाऊन बाल जीवन विमा काढता येतो. याबद्दलची अधिकची माहिती पोस्ट खात्याच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून मिळवता येईल.