
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात करीत ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीच्या शोचे शुटींग सुरू केले आहे. त्यांनी सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर सेटवरील छायाचित्रे शेअर केली. त्यात सेटवर अमिताभ यांच्यासह सर्वचजण पीपीई किट घालून काम करताना दिसत आहेत. त्यांनी ब्लॉगवरही काही छायाचित्रे शेअर केली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून चित्रपट आणि शोचे शूटींग ठप्प झाले. लॉकडाऊनमुळे अमिताभ यांनी केबीसीच्या 12 व्या पर्वाचा प्रोमो तसेच रजिस्ट्रेशन प्रक्रियेचे शुटींग आपल्या घरातूनच केले होते. याचदरम्यान त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. अशा संकटाच्या परिस्थितीतही हिम्मत कायम राखत त्यांनी कोरोनावर मात केली. आता ते पुन्हा केबीसीच्या सेटवर सक्रीय झाले आहेत.
कोरोना महामारीतील या शुटींगबाबतचा अनुभव त्यांनी ब्लॉगवर व्यक्त केला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मर्यादित लोकांच्या हजेरीत शुटींग सुरू केले आहे. सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. कामाव्यतिरिक्त कुणी कुणाशी बोलत नाही. अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळेल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती, असे अमिताभ यांनी ब्लॉगवर लिहिले आहे.
कामावर परतलो आहे. निळ्या रंगाची पीपीई किट परिधान केलेल्या लोकांमध्ये… केबीसी 12. 2000 साली सुरुवात केली होती आणि आता 2020 आहे. म्हणजेच आता 20 वर्षे झाली आहेत, शोचे सूत्रसंचालन करता करता कधी ही वर्षे सरली. कल्पनेपलीकडचे आहे हे सारे.’
– अमिताभ बच्चन































































