पोस्ट कोविडमुळे 24 जणांचा मृत्यू तर अनेकांवर शस्त्रक्रिया, संभाजीनगर मनपाच्या बैठकीत डॉक्टरांची माहिती

sambhaji nagar aurangabad municipal corporation

संभाजीनगर शहरात कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतरही त्यांना त्रास जाणवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बुरशी (फंगल इन्फेक्शन) जंतूमुळे हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले. या आजारामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांचे डोळे काढावे लागले तर 96 जणांच्या जबड्यावर आणि सायनसमुळे 45 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मनपाने आयोजित केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या बैठकीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बाधित रुग्णांची संख्यादेखील वाढत गेली. मात्र, विविध उपाययोजना आणि लसीकरणामुळे कोरोना नियंत्रणात येत असल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर काही नागरिकांमध्ये बुरशी (फंगल इन्फेक्शन) हा आजार आढळून आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोविडनंतर उद्भवणाऱ्या बुरशीजन्य आजाराबद्दल सविस्तर चर्चा करून माहिती घेण्यात आली.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, शहरात कोविडनंतर बुरशीजन्य आजार असलेले रुग्ण आढळून येत आहेत. हा आजार कोविड झाल्यानंतर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो. हा आजार बुरशी (फंगल इंन्फेक्शन) या जंतूमुळे होतो.

अनियंत्रित मधुमेह व कोविड आजारामुळे हा आजार उद्भवतो. या आजाराचे लवकर निदान झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होतो. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरू शकतो. या आजारामुळे जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांचे डोळे काढावे लागले. 96 जणांच्या जबड्यावर आणि सायनसमुळे 105 रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले. कोविडनंतर ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित दंत तज्ज्ञ व नाक-कान-घसातज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा, यासाठी मनपाच्या कोविड हेल्पलाईन क्र. 8956306007 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुरशीजन्य आजाराची लक्षणे

या आजाराची सुरुवात नाकापासून होत असून टाळू, डोळे व नंतर मेंदूपर्यंत पसरतो. नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा, नाक, टाळू (हार्ड पालट) येथे आढळणे, दात दुखणे, गाल दुखणे, चेहऱ्याच्या हाडांना (जबडा) असह्य वेदना होणे, डोळा दुखणे, डोळा सुजणे व दृष्टी कमजोर होणे ही लक्षणे आढळून येतात.

आजाराच्या पायऱ्या

हा आजार होताना सुरुवातीला नाकापर्यंत मर्यादित (नाक व सायनसेस) असतो. त्यानंतर डोळ्यापर्यंत पसरत जातो. याकडे दुर्लक्ष झाले तर मेंदूपर्यंत पसरत जाऊन रुग्ण हा बेशुद्ध पडणे व त्यास अर्धांगवायू होणे असे प्रकार घडतात.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

हा आजार उद्भवल्यास रुग्णाने तातडीने नाकाची दुर्बिणीद्वारे तपासणी करून घ्यावी, नाकातील स्त्रावाची बुरशी जंतूसाठी (को-माउंट) तपासणी करावी. तसेच सीटी स्कॅन व एमआरआय डोळे व सायनसमधील बुरशी जंतुसंसर्ग शोधण्यासाठी करावे.

या आजारावरील उपचार

बुरशीजन्य आजार आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा. बुरशीरोधक औषधी (इंजेक्शन) (अ‍ॅम्फोटेरेसीन-बी, फोसॅकोनॅझोल) हे घ्यावे विंâवा सर्जिकल उपचार करावेत. सौम्य बिटाडीन नाकाचे ड्रॉप टाकावेत. अशा पद्धतीने बैठकीत उपचाराची दिशा ठरविण्यात आली.

या बैठकीस मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अरुण अडचित्रे, डॉ. नळगीकर, डॉ. अमित विश्वे, डॉ. झवर, डॉ. मिश्रीकोटकर, नाक-कान-घसातज्ज्ञ डॉ. वसंत पवार (घाटी विभागप्रमुख), डॉ. वरे, डॉ. प्रवीण सोनवतीकर, डॉ. भारत देशमुख, डॉ. अमोल सुलाखे, डॉ. सावजी व डॉ. रितेश भागवत यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या