
‘अनन्या’ म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास ‘अनन्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे,’ अशी सकारात्मक टॅगलाइन असलेल्या ‘अनन्या’ या चित्रपटाचे पोस्टर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे, जी आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. आपल्या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे म्हणाली, ‘‘आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप ऊर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर निर्माते रवी जाधव म्हणाले, ‘‘आज महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.’’ ‘अनन्या’ 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


























































