घोटी-सिन्नर महामार्ग दुरुस्तीसाठी खड्ड्यात घटस्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । इगतपुरी

घोटी-सिन्नर महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. या रस्त्याची डागडुजी होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवार रणरागिणी आक्रमक झाल्या. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महिलांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घोषणा दिल्या. महामार्गावरील खड्ड्यांचे विधिवत पूजन करून रस्त्यात घटस्थापना केली. देवीची महाआरती घेऊन प्रशासनाला सद्बुद्धी द्यावी अशी महिलांनी प्रार्थना केली.

घोटीपासून इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारा सिन्नरपर्यंतचा महामार्ग अनेक महिन्यांपासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना सामान्य नागरिक आणि वाहनधारक प्रचंड वैतागले आहेत. अपघातांची संख्या वाढली आहे. या रस्त्याची नवरात्रीपूर्वी डागडुजी करावी या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा कांचन दिघे- सहाणे आदी महिलांनी इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन दिले होते. मात्र या निवेदनानंतर 15 दिवस उलटूनही याबाबत प्रशासनाने गांभीर्य न घेतल्याने महिला आक्रमक झाल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे, जिल्हा कार्याध्यक्षा कांचन दिघे-सहाणे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी बुधवार नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी रस्त्यातील खड्ड्यांत घटस्थापना केली.

देवीची आरती घेऊन देवीला महिलांनी प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी म्हणून आर्त प्रार्थना केली. वाडीव्रहे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक तृप्ती आठवले, घोटीचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी नितीन बाहीकर, घोटीचे मंडळ अधिकारी श्याम बोरसे, बांधकाम अधिकारी संजय पाटील, पृथ्वीराज खोकले, तहसीलचे पंकज पाटील यांनी संतप्त महिलांशी तातडीने या विषयावर चर्चा केली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याचा शब्द अधिकाऱयांनी दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.