जपानमध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

उत्तर जपानमध्ये मोठा भूकंप झाला असून, या भूकंपाची तीव्रता ही ६.७ रिश्टर स्केल इतकी होती. जपान हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. भूकंप इवाते प्रांताच्या किनाऱ्याजवळ सुमारे १० किमी खोलीवर झाला.

भूकंपानंतर तातडीने जपान हवामान संस्थेने इशारा दिला की, १ मीटर (३ फूट) उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उत्तरेकडील किनारपट्टी भागात धडकू शकतात. जपानच्या सार्वजनिक प्रसारक NHK ने लोकांना किनारी भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कारण त्सुनामीच्या लाटा कधीही धडकू शकतात. NHK ने असा इशारा देखील दिला की, या प्रदेशात आणखी भूकंप येऊ शकतात.