
>> प्राची गडकरी
आपल्या विभूती अर्जुनाला सांगताना कृष्ण म्हणाला, ऋतूमध्ये मी वसंत आहे आणि जर मासात तुम्ही मला शोधत असाल तर मी मार्गशीर्ष आहे. मार्गशीर्ष माझा आवडता महिना! खरं तर माझ्यासारख्या सर्वसाधारण बुद्धीच्या व्यक्तीला हा अभ्यासाचाच विषय आहे. अर्थात मार्गशीर्ष नववा महिना, मृगशीर नक्षत्र, गुरूचे भ्रमण, त्यातून पौर्णिमेच्या चंद्राचे मार्गशीर्ष होणे वगैरे वगैरे अशी बरीच आध्यात्मिक कारणे त्यासाठी असावीत. परंतु कधी कधी वाटते, सामान्यांना आणि कोणत्याही साहित्यिकाला विचारले की, तुमचा आवडता महिना कोणता, तर 80 टक्के लोकांचे उत्तर असेल श्रावण!
अशी काय जादू आहे या श्रावणाची की, त्याची भूरळ प्रत्येकाला पडतेच पडते. त्या जादूचे एक कारण म्हणजे श्रावणापासून सगळ्या सणांना सुरुवात होते. गोडधोडाला घरात वाव मिळतो. सणासुदीच्या निमित्ताने सग्यासोयऱयांच्या भेटीगाठी होतात. दुसरे कारण म्हणजे ढगांबरोबर लपंडाव खेळणारा सूर्य आपल्या सोनेरी किरणांसोबत नव्याने सृष्टीच्या सेवेत हजर होतो. तिसरे म्हणजे या महिन्यात निसर्ग ऐन तारुण्यात आल्यासारखा दिसतो.
साहित्याचासुद्धा हा आवडता महिना! कारण मराठी साहित्यात असा एकही कवी किंवा लेखक नसेल ज्याच्या लेखणीतून श्रावणातील सौंदर्य उतरले नसावे. कधी लेखकांनी श्रावणात कदंबाला आलेल्या कळ्या टिपल्या, तर कधी लेखकांनी श्रावणातील काळ्या ढगांभोवती फेर धरणाऱया बगळ्यांची गर्भधारणा टिपली. ‘चिरदाह’मध्ये दुर्गाबाईंनी कदंबाविषयी भरभरून लिहिले आहे. ‘साहित्य सहवासा’तसुद्धा शांताबाईंनी कदंबकळ्यांवरील प्रेम व्यक्त करत श्रावणाला धन्यवाद दिले आहेत. कवींविषयीं बोलायचे तर रवींद्रनाथ टागोर, ना.धों.महानोर, बा.भ. बोरकर, मंगेश पाडगावकर हे सगळेच श्रावणकवी आहेत. त्यांच्या पाऊस कवितांमुळे श्रावणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविराजांच्या पाऊस कवितांनी श्रावण लावण्यराज फुलताना आपण अनुभवला आहे.
डोंगर न्हाला रे न्हाला
सुगंध ओला रे ओला
असे म्हणत पाडगावकरांनी श्रावणाला काwतुकाची मिठी मारलेली आपण सगळ्यांनी अनुभवली आहे.
बोरकरांची एक कविता ऐकून तर चक्क त्या श्रावणाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या कवितेनंतर स्वतः श्रावण जणू बा. भ. बोरकरांच्या प्रेमातच पडला. तेच प्रेम त्यांच्या प्रत्येक कवितेत उतरते, ती कविता म्हणजे…
समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला पाचवा म्हैना
वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
जणू सृष्टीला इतकी सुंदर उपमाच कधी कोणी दिला नसावी. सृष्टीला पाचवा महिना म्हणजे पाचवा महिना लागल्यावर गर्भवती जशी सुंदर दिसते तशी ही सृष्टी सुंदर दिसतेय. कारण तिलाही पाचवा महिना लागलाय आणि मराठी महिन्यातील पाचवा महिना म्हणजे श्रावण! किती अफाट कल्पनाशक्ती बोरकरांची ! उगाच नाही बोरकरांना आनंदयात्री म्हणत ! प्रत्येक कवितेत सकारात्मकता बोरकरांचे पाय चेपत बसलेली असते. कधी कधी वाटते, बोरकर नसते तर श्रावण महिन्याचे अफाट सौंदर्य आपल्याला नीट कळलेही नसते.
अगदी तसाच ना.धें.महानोरांना सृष्टीचा भरभरून आशीर्वाद होता. चिंब भिजलेला निसर्ग टक लावून महानोराच्यां चेहऱयाकडे बघत बसायचा. जणू निसर्ग त्यांना विनवण्या करायचा आणि महानोर सहज लिहून जायचे…
घन ओथंबून झरती
नदीस सागर भरती
किंवा
वल्या पान्यात पारा
एक गगन धरा
नाधेंचे शब्द ऐकून निसर्ग सुखावतो आणि श्रावण आला याची आपल्याला खात्री देतो.
चारुदत्त हा कोण कोठुनी
फेकीत अंगावरती शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलून तो हृदयाशी धरला
‘सौभद्र’ नाटकातील या गीताची तेव्हा आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असा श्रावण सृष्टीच्या खांद्यावर हात ठेवून इंद्रधनुच्या झुल्यात बसून झोके घेत आहे. केवळ दोन दिवसांनी तो आपल्या सगळ्यांच्या अंगणात येणार ! तेव्हा सज्ज व्हा त्या श्रावणाच्या स्वागताला! अर्थात त्या श्रावणाचे स्वागत करताना आजही आपल्या ओठांवर सहज पाडगावकरांचे शब्द येतील…
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी





























































