नरेंद्र मोदींच्या डोक्यावर जिरेटोप! प्रफुल्ल पटेलांच्या कृतीमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी देशभरातील एनडीएमधील प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा सत्कार करताना महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवला. पटेल यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

जिरेटोप हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो; परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी तो नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्डय़ात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणाऱया या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिला आहे.

– प्रफुल्ल पटेल लाज बाळगा. ‘जिरेटोप’ आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही, रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे… अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बीभत्स बुद्धी कुठे, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये. कोणत्याही कपडय़ावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालणं ही न शोभणारी गोष्ट आहे. पंतप्रधान महोदय छत्रपती नाहीत. प्रफुल्ल पटेल तुम्हाला समजलं पाहिजे, छत्रपतींचा जिरेटोप कधी घातला जातो, असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला आहे.

पंतप्रधानांना सिंहासनावर बसवणार का?

प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही लाचारी कुठून आली. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावरसुद्धा बसवणार का, असा संतप्त सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.