
सामना ऑनलाईन । यवतमाळ
निवडणूक आयोग हा तटस्थ राहिलेला नाही. तो भाजपचा सहयोगी म्हणून काम करीत आहे. जर आमचे सरकार सत्तेवर आले तर आम्ही निवडणूक आयुक्तांना पाहून घेऊ, त्यांना दोन दिवसांसाठी तुरुंगात टाकू’ असे धक्कादायक विधान प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ येथे केले.
बहुजन वंचित आघाडीने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातही आपला उमेदवार उभा केला. या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यवतमाळमध्ये आले होते. तेथे त्यांची सभा झाली. या सभेत बोलताना आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मला हे कळत नाही की आम्हाला पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत बोलण्याचे स्वातंत्र्य का नाही! वास्तवात संविधान आम्हाला असे स्वातंत्र्य देते.
या सभेला एमआयएमचे सर्वोसर्वा खासदार असदुद्दीन ओकेसी मात्र हजर नव्हते. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या 25 मिनिटांच्या भाषणात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. तसेच बुधवारी दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावरील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की, पुलवामा हल्ला हे मॅच फिक्सिंग होते. या हल्ल्यासंदर्भात बोलण्यास निवडणूक आयोग रोखते असा दावा आंबेडकरांनी केला.



























































