
सामना ऑनलाईन, अकोला
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्याने वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. या आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोल्यामध्ये बोलताना काँग्रेसबाबत परखड मत व्यक्त केले. आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसने त्यांचा पक्ष मातीत मिळवला असं ते म्हणाले. परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसची NGO म्हणजेच सामाजिक संस्था होईल असं आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक काँग्रेस आघाडीसोबत लढली होती. या निवडणुकीत शेट्टी यांचा दणदणीत पराभव झाला होता. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ‘मी शेट्टी यांना आधीच सांगितले होते की तिथे निवडून येण्याची खात्री नाही,आमच्यासोबत असाल तर हमखास विजयी झाला असता.’ विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना सोबत घेण्याचा प्रयत्न होणार का असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की आमच्या काही कार्यकर्त्यांची त्यांच्यासोबत बोलणी सुरू झाली आहेत.
































































