वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून कुणासोबतही युती करणार

महानगरपालिका निवडणुकीत भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचितचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सर्व जिल्हा अध्यक्षांना तसे आदेश दिले आहेत.

राज्यात होऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, भाजप सोडून कोणासोबतही युती करा, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस बरोबर युती केली तर चालेल, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत.

भाजप काही ठिकाणी त्यांच्या मित्रांबरोबर चालली आहे, तर काही ठिकाणी युती करणार नाही. कॉंग्रेस सुद्धा काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत चालली आहे, काही ठिकाणी नाही. त्यामुळे युती व आघाडी करण्याचे अधिकार ज्या महापालिका आहेत, तिथल्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यांनी कोणासोबत युती करता येईल याची चाचपणी करावी. मात्र, भाजपसोबत युती करायची नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना-मनसे युतीचे स्वागत

शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे, ही चांगली गोष्ट आहे, दोघांचं स्वागत अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी दिली.