
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
देशात तब्बल दोन हजार विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ‘स्वयंम’ या योजनेव्दारे हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकणार आहेत. स्वयंम म्हणजे कधीही, कुठेही, केव्हाही शिकण्याची संधी असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. गोवा विद्यापीठाच्या 31 व्या पदवीदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
संशोधन आणि नवीन कल्पना यात देशाची तरूणपिढी सध्या मागे असून जास्तीत जास्त संशोधनावर भर देण्यासाठी सध्या देशातील सुमारे तीन हजार शाळांमध्ये अटल इनोव्हेशन मिशनद्वारे नवीन कल्पना राबविल्या जात आहेत. या मिशनद्वारे सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी 3 थ्री प्रिंटीग, रोबोटीक्स आणि अन्य यंत्राच्यासहाय्याने शिक्षण घेत असल्याचेही जावडेकर यावेळी म्हणाले.
यापुढे नॅक मानांकनावर रूसाचे अनुदान नाही
छोटय़ा विद्यापीठांना राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानातंर्गत (रूसा) देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी विद्यापीठांची वेगळी मानांकन यादी बनविण्यात येणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. नॅकच्या मानांकनात मागे असलेल्या विद्यापीठांना रूसाचे अनुदान मिळण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार असून लवकरच तो केंद्र सरकारकडे सोपविला जाईल, अशी माहितीही यावेळी जावडेकर यांनी दिली. हे शैक्षणिक धोरण ‘केजी टू पीजी’ पर्यंत लागू असून शिक्षणात दर्जेदारपणा, संशोधन आणि बदलाची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. देशातील सर्वसामान्य व्यक्तीला शिक्षण मिळावे, हे या धोरणाचे उद्दीष्ट आहे. या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणपद्धतीला नवी दिशा मिळेल असा विश्वासही जावडेकर यांनी व्यक्त केला.




























































