
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
[email protected]
कुळधर्म-कुळाचार म्हणून सादर होणारे भराड हे एक विधिनाटय़. भैरवनाथाचे भराड म्हणून लोकप्रिय असणारी ही लोककला. नाथपंथी डौरी गोसावी समाजातील दीक्षा घेतलेले भैरवनाथाचे उपासक भराड सादर करतात.
अंबा, भवानी, रेणुका आदी शक्तिदेवतांचे उपासक कदमराई गोंधळी, रेणुराई गोंधळी, खंडोबाचे उपासक वाघ्ये व मुरळ्या तसेच भैरवनाथांचे उपासक भराडी म्हणून ओळखले जातात. अंबेचा गोंधळ, खंडोबाचे जागरण आणि भैरवनाथाचे भराड हे कुळधर्म-कुळाचार म्हणून लग्न-मुंजीच्या प्रसंगी सादर होते. नाथपंथी डौरी (डवरी) गोसावी समाजातील दीक्षा घेतलेले भैरवनाथाचे उपासक भराड सादर करतात. काळभैरव हे भराडय़ांचे आराध्य दैवत. भराडी लोकांची वस्ती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, नगर या काही जिह्यांमध्ये तसेच खान्देशातील आणि मराठवाडय़ातील काही भागांमध्ये आहे.
लोकगायकांची परंपरा या डॉ. प्रभाकर मांडे यांच्या ग्रंथांत भराडय़ांबद्दलची माहिती आलेली आहे, ती अशी – डोक्याला भगवा रुमाल, अंगावर भगवा सदरा, त्यावर जाकीट, सफेद धोतर आणि काखेत झोळी, कपाळावर विभूती, गळ्यात चांदीची शृंगी म्हणजेच शिंगी असा भराडय़ाचा वेष असतो. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी मुलास नाथपंथाची दीक्षा दिली जाते. सोळाव्या वर्षापर्यंत भराडय़ाची दीक्षा दिली जाते. भराडी समाजातील गुरुस्थानी असणारा एखादा वडीलधारा माणूस मुलाला भराडय़ाची दीक्षा देतो. विवाहमंगल कार्यापूर्वी, सोनाराकडून देव उजळून आणल्यावर व कार्य उरकल्यावरही भराड करतात. तसेच नवरात्र उत्सवाच्या वेळी रोज रात्री भैरवनाथाच्या मंदिरात भराड होते.
भराडात आख्यान सादर करताना चालू घडामोडी, समाजातील वास्तव यांचे संदर्भ येत असतात. समाजातील सर्व स्तरांवरील घटना-प्रत्ययांचे भाष्य त्यातून होत असते. भक्त-रसिकांचा कंटाळा व आळस घालविण्यासाठी भराडी काही विनोदी कवने सादर करतो. त्याला कंडी असे म्हटले जाते. भराडात कंडीसोबत खांडण्याही येतात. भराडाच्या तुलनेत जागरणात आणि गोंधळात कंडी आणि खांडण्या अधिक येतात. कारण भराडाच्या तुलनेत जागरणात आणि गोंधळात कथन कौशल्य अधिक असते.
जोगी आणि गोसावी हे दोन्ही भराड सादर करतात. काही गोसावी ब्राह्मणांप्रमाणे मंदिरात पौरोहित्य करतात. त्यांच्यावर नाथ संप्रदायाचा फार मोठा प्रभाव आहे. लग्न-मुंजीच्या प्रसंगी कुळधर्म-कुळाचार म्हणून सादर होणारे भराड हे एक विधिनाटय़ आहे. भराड घालताना आधी पाच पावली होते. नवरदेवाच्या खांद्यावर घोंगडी, लंगर देतात आणि नवरीच्या हातात खंडोबा, भैरवनाथ आणि भवानी यांचे चांदीचा मुलामा दिलेले टाक असतात. पाच पावलीला चौदा नैवेद्य, कणकेचे चौदा दिवे सोबत नेले जातात. राखणदार म्हसोबाला पंचखाद्य दिले जाते. रोट, दहीभात, अंडे, चिलीम, गुलाल, विडी, शेला-मुंडासे, नारळ, कणकेचे दिवे हे साहित्य वाहिले जातात.
शेतात भैरवनाथाचे मंदिर ज्या दिशेला असेल, त्या दिशेला गोमूत्र, गोमय याने शेतातली जागा शुचिर्भूत करून तेथे फुले वाहून भंडाराची गादी भरली जाते. तांदळाची गादी भरली जाते. भैरवनाथाची आरती केली जाते व पाच पावली झाल्यावर नवरा-नवरी पुन्हा घराकडे येतात. त्यावेळी भैरवनाथ, देवी, खंडोबा यांचे घट मांडले जातात. जोंधळ्याच्या पाच ताटांचे मखर तयार केले जाते. या मखराला फुलांचा हार घातला जातो. मखरात गहू-तांदळाचा चौक पाटावर घातला जातो. त्यावर शक्तिदेवता, शिवकुलातील देवता यांचे प्रातिनिधिक घट भरून या पाणी भरलेल्या कलशात नागवेलीची पाच पाने टाकून त्यावर नारळ ठेवले जातात. भराडातील हा घट भंडार, कुंकू, विभूती आणि फुले यांनी भरला जातो. भराडातील या घटासमोर शैलशिंगी त्रिशूळ, डम डिग्री या वस्तूंची पूजा केली जाते. डम डिग्री या वाद्याला भराडामध्ये अधिक महत्त्व आहे. हे वाद्य शिवाचे म्हणून पुजलेही जाते. भैरवनाथाचे भराड करताना पाच पावली, कोटंबापूजन, काकडे नाचविणे, ओझे उतरणे आदी विधी केले जातात. शिवस्तुती, गण-देवतांना आवाहन, भैरवनाथाची स्फुट पदे, शंकराची अथवा भैरवनाथाची अवतार कथा आणि आरती असा भराडाचा आविष्कार क्रम असतो.
भराडात डौर किंवा डम डिग्री, तुणतुणे आणि मंजिरी हे वाद्य वाजवतात. डम डिग्री एक चर्मवाद्य. शिवाने तांडव नृत्याच्या प्रसंगी या वाद्याची निर्मिती केली असे म्हणतात. पोवाडा, कलगी-तुरा, गोंधळ, भराड, तमाशा आदी लोककलांमध्ये तुणतुणे हे तंतुवाद्य वापरले जाते. मंजिरी भराडी व त्याचे सहकारी वाजवितात. तालवाद्य, लयवाद्य डम डिग्री आणि तंतुवाद्य तुणतुणे या वाद्यांचे प्राधान्य भराडात दिसते.
आजही भराडाकडे केवळ एक कुळधर्म-कुळाचार, एक विधिनाटय़ म्हणूनच पाहिले जाते. जागरण, गोंधळासोबतचा एक पूरक कुळधर्म-कुळाचार एवढीच भराडाची ओळख राहिली आहे.
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
























































