
सामना प्रतिनिधी । इंदौर
लॅपरोस्कोपीच्या एकाच दिवशी सलग 502 शस्त्रक्रिया करणे सोपे काम नाही. पण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. प्रकाश शेरे यांनी हे शिवधनुष्य एका हाती पेलले. हा एक विश्वविक्रमच होता. त्याबद्दल लंडनच्या ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे इंदौर येथे नुकताच डॉ. शेरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या परदेशी संस्थेचे चेअरमन आणि ब्रिटीश पार्लमेंटचे खासदार डॉ. दिवाकर शुक्ल आणि मेरठ आयआयटी विद्यापीठाचे कुलपती डॉ. योगेशी मोहन गुप्ता यांच्या हस्ते डॉ. शेरे यांना नुकतेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यानंतर प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या हस्ते शेरे यांना अशोक स्तंभ असलेले ऍवॉर्ड प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. प्रकाश शेरे यांची पत्नी डॉ. जयश्री शेरे याही उपस्थित होत्या.
एका लहानशा खेड्यात जन्म झालेल्या डॉ. प्रकाश शेरे यांनी केलेला विक्रम मोठाच आहे. कारण गेल्या 35 वर्षांत एका वर्षांत 502 शस्त्रक्रिया कुणीही केल्या नाहीत. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना ब्रिटनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स युनिव्हर्सिटीने ऑनररी डी.लिट. ही पदवी बहाल केली असून याच वर्षीच्या खास दीक्षांत समारंभात त्यांना ती प्रदान करण्यात येणार आहे. ‘माझा हा बहुमान हा हिंदुस्थान राष्ट्राचा बहुमान असल्याचे मी मानतो. हा पुरस्कार मी माझे कै. आईवडिलांना आणि माझ्या तमाम रुग्णांना समर्पित करतो’ अशा शब्दात डॉ. प्रकाश शेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




























































