प्रकाशगडमध्ये ‘उंदीर हटाव’ मोहीम, कर्मचाऱ्यांना आता केबिनऐवजी कॅण्टीनमध्ये जेवणे बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगडमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्यामुळे त्याची इमारतीचे व्यवस्थापन पाहणाऱया स्थापत्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी केबिनमध्ये जेवण्याऐवजी तळमजल्यावर असलेल्या कॅण्टीनमध्ये जेवणाचे निर्देश दिले आहेत. तसेच कचऱयाच्या डब्यात शिल्लक अन्न टाकू नये, तसेच रिकाम्या जागेतील जुन्या फाइल्स हटवण्याबाबत बजावले आहे.

प्रकाशगड इमारतीमध्ये रिकाम्या जागेत जुने रेकॉर्ड, फाइल्स आणि फर्निचर ठेवल्याने उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नवीन रेकॉर्ड कुरतडण्याबरोबरच इलेक्ट्रिक वायरिंगला धोका पोहचण्याची शक्यता होती. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने उंदीर हटवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये जुने रेकॉर्ड, फर्निचर हटवटणे, जेवणाचे ठिकाण आदींबाबत कर्मचाऱयांना सूचना दिल्या आहेत.

पालिकेने घेतली दखल
प्रकाशगडमध्ये उंदरांच्या सुळसुळाटाची पालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यानुसार पालिकेच्या एच-पूर्व विभागाच्या पथकाने गुरुवारी प्रकाशगडमध्ये जाऊन पाहणी केल्याची माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंद्रेकर यांनी दिली. तसेच खाद्यपदार्थ उघडय़ावर टाकू नका, तसेच कचरा, रद्दी हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर इमारतीमध्ये पेस्ट कंट्रोल कोणाकडून केले जाते त्याचीही माहिती मागविली आहे.