Ashadhi Wari 2025 – खासदारताई गायब! वारीच्या नियोजन बैठकांना प्रणिती शिंदेंची दांडी; मतदारांतून नाराजीचा सूर

आषाढी वारीच्या नियोजनासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. या नियोजनात पंढरपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती दिसत नसल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

येत्या 6 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासन आणि पालखी मार्गावरील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी वारकरी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मात्र आपल्या मतदारसंघातील पंढरपूर तालुक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

श्रीक्षेत्र जेजुरीत माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण

वारीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी मंडळी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूरमध्ये सातत्याने बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये खासदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी हजेरी लावत नसल्याने अडचणी सोडविण्यासाठी दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. पंढरीत येणाऱ्या भाविकांबरोबर स्थानिक नागरिकांच्या काही अडीअडचणी असतात त्या जाणून सोडविण्याची आवश्यकता असते. मात्र, खासदारताई गायब असल्याने पंढरपूरकर जनता हवालदिल झाली आहे.

चंद्रभागेतील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पंढरीत पुराचे सावट

लोकसभा निवडणुकीत पंढरपूरकरांनी प्रणीती शिंदे यांना भरघोस मतदान केल्याने ताई खासदार झाल्या. खासदार झालेल्या ताईंनी मतदार अडचणीत असताना त्यांचे ऐकून गाऱ्हाणे सोडवावे, अशी मतदारांची अपेक्षा असते. मात्र मतदारांच्या अपेक्षांचा भंग झाला असून लोकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.