वयाचे रहस्य काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

‘सजीवांचे वय’ हा कायमच एक उत्कंठेचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. सजीवांना नैसर्गिकपणे येणाऱया मृत्यूवर आणि सजीवांच्या आयुर्मर्यादेवर जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. सजीवांची आयुर्मर्यादा नक्की कशी ठरवली जाते? मानवाचे सरासरी आयुर्मान हे 70 ते 80 वर्षे आहे. मात्र प्राण्यांकडे पाहिल्यास कुत्री, मांजरी, घोडे जन्मानंतर काही वर्षांतच मृत्यू पावतात. मानवाच्या आणि प्राण्यांच्या शरीरात नक्की काय फरक आहे? या दोघांचा वृद्धापकाळ येत जाणे कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? त्यांच्यावर वयोमानाचा फरक कसा पडत जातो? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात आता ब्रिटिश संशोधकांनी यश मिळवले आहे असा त्यांचा दावा आहे.

ब्रिटनच्या ‘वेलकम सेंगर इन्स्टिटय़ूट’च्या संशोधकांनी विविध सस्तन प्राण्यांचा अभ्यास करून या विषयावर महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सजीवांच्या ‘डीएनए’मध्ये (DNA) त्यांच्या वयाचे रहस्य लपलेले आहे. ‘डीएनए’ जितक्या वेगाने बदलत जातो; तितका तो जीव जगण्याची शक्यता कमी होत जाते. शास्त्रज्ञांनी या विविध सजीवांवर केलेल्या अभ्यासानुसार असे आढळून आले की, चार वर्षांपेक्षा कमी जगणाऱया उंदराच्या डीएनएमध्ये वर्षाला सरासरी 800 बदल होतात. त्याचप्रमाणे सिंहांमध्ये 160 वेळा, कुत्र्यांमध्ये साधारण 249 वेळा, तर जिराफामध्ये 99 वेळा आणि मानवांमध्ये सुमारे 47 वेळा ‘डीएनए’ बदलतो. या बदलानुसार त्यांच्या सरासरी वयात फरक पडत जातो.

विशेष म्हणजे या ‘डीएनए’च्या बदलाबरोबर संशोधकांना असे आढळून आले आहे की, ‘डीएनए’मध्ये होणाऱया ‘उत्परिवर्तना’ची (Mutation) संख्या मात्र सर्व सजीवांमध्ये जवळपास एकसारखी आहे. या सर्व सजीवांमध्ये आयुष्यभरात सरासरी 3200 वेळा ‘उत्परिवर्तन’ घडते. ज्या सजीवांमध्ये ‘उत्परिवर्तन’ जास्त वेळा घडते; ते लवकर मृत्युमुखी पडतात. या संशोधनासाठी संशोधकांनी मानवासोबतच कुत्रा, उंदीर, जिराफ, सिंह, घोडा, मांजर अशा एकूण 16 विविध सस्तन प्राण्यांचा अभ्यास केला आहे.

‘उत्परिवर्तना’ची गतीदेखील महत्त्वाची असते असे संशोधकांचे मत आहे. उदा. एखाद्या उंदरीच्या ‘डीएनए’मध्ये ज्या वेगाने ‘उत्परिवर्तन’ होते; त्या वेगाने मानवाच्या शरीरात झाले असते तर मानवाच्या संपूर्ण आयुष्यात एकूण 50 हजारांपेक्षा अधिक वेळा ‘उत्परिवर्तन’ घडले असते. मात्र असे होत नाही. असेदेखील समोर आले आहे की, हे सस्तन प्राणी विविध वयोगटांतले असूनदेखील त्यांच्यामध्ये ‘डीएनए’चे ‘उत्परिवर्तन’ एकसमान आहे. मात्र यामागे नक्की काय कारण आहे, ते अजून संशोधकांना शोधता आलेले नाही.

या अभ्यासाला अजून गती देण्यासाठी म्हणून संशोधक आता ‘ग्रीनलॅंड शार्क’ या माशाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहेत. या माशाचे आयुर्मान तब्बल 400 वर्षे आणि कधी कधी त्यापेक्षादेखील जास्त इतके प्रचंड आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या थंड आणि खोल पाण्यात आढळणाऱया या जीवाची लांबी 5 मीटरपर्यंत असते. ग्रीनलॅंड शार्क वर्षाला फक्त एक सेंटिमीटर वाढतो; तर 150 व्या वर्षी त्याला लैंगिक परिपक्वता येते, असा हा एक अनोखा जीव आहे.

संशोधक या अभ्यासाद्वारे कर्करोगावरील उपाय शोधण्याचादेखील प्रयत्न करत आहेत. असे मानले जाते की, शरीरात अधिक पेशी असलेले जीव जास्त काळ जगतात. मात्र ते कर्करोगाला बळी पडण्याची शक्यतादेखील इतरांपेक्षा जास्त असते. मात्र काही संशोधक या दाव्याला असत्य मानतात. या संशोधनाचा एक हिस्सा असलेले डॉ. एलेक्स केगन हा दावा पुराव्यासकट खोडून काढतात. त्यांच्या म्हणण्यानुसार व्हेल माशाच्या शरीरात मानवापेक्षा कितीतरी अधिक पेशी असतात. मात्र कर्करोगाचे प्रमाण हे मानवात जास्त आढळून येते. त्यांच्या अभ्यासानुसार कर्करोगाचे रहस्य हे ‘उत्परिवर्तना’मध्ये दडलेले असण्याची दाट शक्यता आहे. ‘उत्परिवर्तना’चा वेग जितका कमी असेल, तितका कर्करोगाचा धोकादेखील कमी असेल असेदेखील ते नमूद करतात. सध्या संशोधक यादृष्टीनेदेखील त्यांचा अभ्यास तपासून घेण्याचे काम करत आहेत.

[email protected]