
>> प्रसाद ताम्हणकर
मागील लेखात आपण मोबाइलचा रंजक प्रवास पाहिला. मोबाइलच्या शोधापासून ते त्याच्या सहजपणे सुरू झालेल्या वापरापर्यंतचा हा प्रवास होता. जगभरातील अनेक देशांत मोबाइलचा वापर सुरू झाला असला तरी सुरुवातीच्या काळात तो फक्त धनाढय़ लोक आणि काही मोठे व्यापारी आणि व्यापारी संस्था इतकाच मर्यादित होता. 1980 च्या दशकात ‘1जी’ मोबाइल नेटवर्कचा वापर केला जात असे. त्या काळात मोबाइलदेखील एखाद्या पेटीच्या आकाराचे असत आणि त्यावर फार कमी वेळाचे संभाषण शक्य असे.
1990 मध्ये ‘1जी’ नेटवर्कची पुढची पिढी अर्थात ‘2जी’ मोबाइल तंत्रज्ञान अस्तित्वात आले. या नव्या तंत्रज्ञानामुळे फक्त व्हॉईस कॉलसाठी वापरात येत असलेल्या मोबाइलला संदेश पाठवण्याची अर्थात ‘एसएमएस’ सेवेची जोड मिळाली आणि मोबाइलच्या मागणीत अशी वाढ सुरू झाली की, जी पुढे कधीच कमी झाली नाही. मोबाइलपेक्षा काहीशी जास्त मागणी आणि वापर असलेला पेजर ‘2जी’ तंत्रज्ञान आल्याने अनेक पेजरधारकांसाठी याच काळात निरुपयोगी ठरू लागला असे दूरसंचार क्षेत्रातील अनेक तज्ञांचे मत आहे.
2000 साली मोबाइल नेटवर्क तंत्रज्ञानाने एक उत्तुंग भरारी घेतली आणि ‘3जी’ नेटवर्क तंत्रज्ञान मोबाइलसाठी उपलब्ध झाले. या तंत्रज्ञानाचे वैशिष्टय़ म्हणजे आता मोबाइलद्वारे इंटरनेट ब्राऊझिंगदेखील सहज शक्य झाले आणि मोबाइलचा आकारदेखील खिशात मावण्याएवढा कमी होऊ लागला होता. या तंत्रज्ञानाने खऱ्या अर्थाने मोबाइलच्या वापरात एक ाढांती आणली असे म्हणायला हरकत नाही. या तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोबाइलच्या मागणीने एकदम मोठी झेप घेतली आणि अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले.
2010 साली जगाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘4जी’ तंत्रज्ञानाचा उगम झाला आणि खऱ्या अर्थाने मोबाइल सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत बनला. वेगवान, अचूक स्मार्टफोनच्या जोडीला आता अधिक वेगवान इंटरनेट ब्राऊझिंग, अॅप स्टोअर आणि त्याद्वारे मिळणारी विविध उपयोगी अॅप्स, यूटय़ूबसारखे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आणि स्मार्टफोनला खऱ्या अर्थाने लहान संगणकाचे रूप प्राप्त झाले. मोबाइल बँकिंगपासून ते अनेक सरकारी सुविधांचा ऑनलाइन लाभ मिळण्यापर्यंत आणि देशविदेशातील मनोरंजन ते अगदी शेतीपूरक माहिती मिळण्यापर्यंत सर्व काही एका ‘टच’वर उपलब्ध झाले. व्हॉईस कॉलच्या जोडीला व्हिडीओ कॉल्स, व्हिडीओ
कॉन्फरन्सचा वापर वाढला. ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात तर मोबाइल करोडो लोकांचा अगदी जिवाचा जोडीदार बनून गेला.
2020 साली ‘4जी’ तंत्रज्ञानापेक्षा शंभरपट वेगवान अशा ‘5जी’ तंत्रज्ञानाचे आगमन झाले आहे. जगभरातील अनेक प्रमुख देशांत ‘5जी’ सेवा सुरू झाली आहे. हिंदुस्थानमध्ये ही सेवा येण्यास काहीसा उशीर झाला असला तरी देशाच्या काही प्रमुख शहरांमध्ये आता ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कमी होत चाललेल्या मोबाइलच्या किमती, परवडणाऱ्या दरातील डाटा प्लॅन्स यामुळे या सेवेलादेखील आपल्या देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘5जी’ तंत्रज्ञान हे जगाचा चेहरामोहरा बदलून टाकेल असा विश्वास दूरसंचार तज्ञ ठामपणे व्यक्त करत आहेत. ‘5जी’ तंत्रज्ञानामुळे ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हिडीओ गेमिंग, अॅडव्हान्स व्हिडीओ, कनेक्टिंग व्हेईकल, इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या गोष्टींचा वापर वेगाने आणि सुलभ होणार आहे. त्यामुळे आपल्या खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही आयुष्यात मोठय़ा घडामोडी घडणार आहेत. एरिक्सन कंपनीच्या मते 2035 पर्यंत संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत ‘5जी’ तंत्रज्ञान त्र्13.2 डॉलर्सची महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
मोबाइल नावाच्या यंत्रासोबत त्याच्या तंत्रज्ञानातदेखील अत्यंत वेगवान असा बदल घडत आला आहे. हे सर्व खरे असले तरी काही प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आगामी काही काळात मोबाइलचे अस्तित्व नष्ट होणार असल्याचे अर्थात मोबाइल यंत्राची गरज संपुष्टात येणार असल्याचे भाकीत करत आहेत. मोबाइल यंत्राचे काम भविष्यात मानवी शरीरात बसवलेल्या छोटय़ा आकाराच्या चिप्स सहजपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एलॉन मस्कसारख्या लोकांनी तर या तंत्रज्ञानावर अधिकृतरीत्या कामदेखील सुरू केले आहे.























































