साय-फाय – आर्टिफिशल इंटेलिजन्सचे निवडणुकांवर सावट

>> प्रसाद ताम्हणकर

अमेरिकेत नुकत्याच घडलेल्या एका घटनेने जगभरातील अनेक विचारवंतांना आणि राजकीय अभ्यासकांना चिंतेत टाकले आहे. मार्च महिन्याच्या शेवटी अमेरिकेच्या ग्रँड ज्युरींनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोप निश्चित केले. या घटनेने तिथे चांगलीच खळबळ माजली. हे सर्व प्रकरण झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड मोठय़ा प्रमाणात चर्चेत आला आणि शेअरदेखील केला गेला. त्या व्हिडीओमध्ये, ज्यामध्ये अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस व्हाईट हाऊसमध्ये पार्टी साजरी करताना दिसत होते. पुढे हा व्हिडीओ खोटा असल्याचे आणि AI अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) सहाय्याने बनवल्याचे समोर आले आहे.

ज्या दिवशीचा हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला होता, त्या दिवशी अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित नव्हते हे सिद्ध झाले आणि या बनावट व्हिडीओचे भांडे फुटले. या व्हिडीओबरोबरच त्या दोघांची पार्टी करतानाची काही बनावट छायाचित्रेदेखील अशीच लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. हे लोक येणाऱ्या अध्यक्ष निवडणुकांमध्ये मतदानाची महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत आणि हीच गोष्ट राजकीय अभ्यासक व विचारवंतांच्या चिंतेत भर घालणारी आहे.

अमेरिकाच नव्हे, तर इतरही अनेक देशांत होणाऱ्या भविष्यातील निवडणुकांमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक बनावट व्हिडीओ, छायाचित्रे, लेख, माहिती एका क्लिकवर लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. ही छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके बेमालूमपणे तयार केलेले असतात की, त्यांची सत्यता तपासण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांनादेखील बराच वेळ लागतो आणि काही चाचण्यादेखील कराव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखणे अत्यंत अवघड होणार आहे. त्यामुळे खोटय़ा प्रचार साहित्याला हे नागरिक भुलले तर आश्चर्य नाही.

सोशल मीडियावरील एखाद्या पोस्टमुळे अथवा चुकीच्या माहितीमुळे दंगे उसळण्याचे, दोन गटांत वाद होण्याचे प्रकार आता सर्वत्र वेगाने घडताना दिसत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून एखादी माहिती अत्यंत कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचवता येते. मात्र याच सोयीचा फायदा घेऊन काही समाजकंटक धार्मिक द्वेष पसरवणारे लिखाण, खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यांची डोकी भडकवतात. आता या सोशल मीडियाला आर्टिफिशल इंटेलिजन्सची साथ मिळाली आहे, जे सर्वांसाठीच अत्यंत धोकादायक आहे.

जनरेटिव्ह आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात चॅट-जीपीटी हे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉंच झाले आणि काही दिवसांपूर्वीच ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले. काही मिनिटांत कोणत्याही विषयावर निबंध, लेख लिहून देणाऱ्या, दिलेल्या शब्दांवर गाणी रचणाऱ्या, चित्रे काढणाऱ्या या चॅट-जीपीटीचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले. मात्र हळूहळू त्याचे काही दुष्परिणाम जसे समोर येऊ लागले, तसे हे तंत्रज्ञान चुकीच्या हातात गेल्यास किती धोकादायक ठरू शकते हेदेखील लक्षात आले. अमेरिका आणि युरोपमधील काही शाळा आणि महाविद्यालयांनी तर चॅट-जीपीटीच्या वापरावर चक्क बंदी घातलेली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाईदेखील करण्यात येत आहे.

हिंदुस्थानसारख्या सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या देशात गेल्या काही वर्षांपासून वेगाने जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण विचारपूर्वक केले जात असल्याचा आरोप राजकीय अभ्यासक कायम करत असतात. काही पक्ष, संघटना या स्वतच्या फायद्यासाठी हे घडवत असल्याचेदेखील बोलले जाते. अशा संघटना अत्यंत विचारपूर्वक आर्टिफिशल इंटेलिजन्सचा हत्यार म्हणून वापर करतात हे अनेकदा दिसून आलेले आहे. अमेरिकेसारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या देशात जर अशी एखादी बनावट पोस्ट सहजपणे खरी मानून प्रचंड शेअर केली जात असेल तर आपल्या देशाने त्यातून नक्कीच धडा घ्यायला हवा आहे.

आपल्या मोबाइलवर येणारी प्रत्येक माहिती, प्रत्येक फोटो आणि प्रत्येक व्हिडीओची सत्यता आता आपणच तपासायला हवी आहे. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट आहेत, ज्यांच्या मदतीनं आपण सत्य-असत्य काही वेळात शोधून काढू शकतो. AI नावाच्या या तंत्रज्ञानाचा वापर वाईटासाठी नाही, तर भल्यासाठी व्हावा ही आता आपल्यासारख्या सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे.