
>> प्रसाद कांबळी, नाट्य निर्माते
आईच्या हातचा आवडता पदार्थ कोणता ?
– चिंबोरीचा रस्सा, चिंच-गुळाची आमटी, मासे, मालवणी पद्धतीचं चिकन, माशांची आमटी, बोंबलाचं तिखलं, बटाट्याची काप, व्हेज कुरमा, पोहे
का आवडतं?
– मम्मी सुगरणं आहे आणि तिच्या हाताला चव आहे. विशेष म्हणजे खाण्याच्या बाबतीत मी खूपच चुझी आहे. सगळेच पदार्थ खातो, असेही नाही. बोंबिल खात नाही, पण बोंबलाचं तिखलं आवडतं. कुर्ल्या, कोलंबी, हलवा हे मासे फक्त आईच्या हातचेच आवडतात. त्यामुळे शक्यतो मला कोणी घरी जेवायला बोलवत नाही. हे पदार्थ माझे फेव्हरेट आहेत.
सगळ्यात जास्त काय miss करता ?
– खेडक्याचं कालवण मला आईच्या हातचं जास्त आवडतं. ते करणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी व्यवस्थित तयार लागते आणि वेळही जातो. मी आतापर्यंत फक्त तिच्या हातचंच खेकड्याचं कालवण खाल्लं आहे. महत्त्वाचं म्हणजे मासे आपण रोज आणून खाऊ शकतो, पण ही रेसिपी रोज बनवली जात नाही. त्यामुळे ही डीश जास्त miss करतो.
स्वयंपाकात, घरकामात आईला मदत करता का ?
– नाही. स्वयंपाकात, घरकामात आईला, बायकोला कोणालाच मदत करत नाही. उलट माझा त्या लोकांना त्रास होतो. त्यामुळे मदत करणं नाही.
आई म्हटल्यावर किंवा समोर आल्यावर मनात सर्वप्रथम काय विचार येतो ?
– वडिलांच्या नाटकांचे प्रयोग असायचे. त्यांचा स्ट्रगल करण्याचा काळ होता तेव्हा आई-वडील दोघांचीही ईच्छा होती की, मुलांनी खूप शिकावं. मी आणि माझी मोठ्या बहिणीच्या शिक्षणावर तिचा खूपच भर होता. तिची शिस्त, तिचा आमच्यावर असलेला प्रभाव तसेच बालपणापासून आतापर्यंत जी काही जडणघडण झाली. त्या काळी जी काही गरिबी आम्ही बघितली त्यामध्ये तिने कधीही कमीपणा जाणवू दिले नाही. मम्मी म्हणजे आमच्या घराची सुपर पॉवर, होम मिनिस्टर आहे.
आईला काय आवडतं?
– ती कुडाळदेशकर आहे. माझं आजोळ वसईला आहे. वसईच्या भाज्या त्यामध्ये केळफुलाची भाजी, शेगल्याची आणि शेवरीची भाजी, अळुचं फदफदं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तिला आवडतात. शाकाहारी आवडतं तितकंच मांसाहारीही आवडतं. तिला मटण, भेजा, कलेजी हेही आवडतात. विशेषत: वसईत बालपण गेल्यामुळे वसईच्या स्पेशल पदार्थ खाण्याची तिला आवड आहे. ती माहेरची कुडाळदेशकर आणि सासरची भंडारी त्यामुळे दोन्ही पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ तिला आवडतात. यासोबत ईडली, डोसा असे पदार्थ खाण्याचीही तिला आवड आहे. तिला पास्ता वगैरे आवडतं नाही, ते मलाही आवडत नाही.
तिच्या आवडीचा पदार्थ तुम्ही कधी केलाय का ?
– मी कधी कधी मसाला पाव, चिकन बनवतो. माझं करणं जरा फास्ट असतं, पण सगळी तयारी करून द्यावी लागते. मी केलेले पदार्थ तिला आणि घरी सगळ्यांनाच खायला आवडतात, पण तिच्या आवडीचे म्हणजे शेगल्याची भाजी, शेवरीची, केळफुलाची भाजी असे पदार्थ बनवणं मला शक्यच नाही. वर्षातून एकदा वगैरे कधी तरी मूड आला तर मी असे पदार्थ बनवतो. फूडी असल्यामुळे मी चांगला पदार्थ बनवू शकतो, फक्त मला त्याची तयारी करून दिली पाहिजे. कधी कधी आधी काय टाकायचं हे समजत नाही, त्यामुळे तयारी करावी लागते.
आईशी गप्पा कोणत्या विषयावर मारता ?
– माझी मम्मी ऑलराऊंडर आहे. ती राजकारणापासून कोणत्याही विषयावर कोणाशीही बोलू शकते. माझ्यापेक्षाही जास्त बोलू शकते.
आवडत्या पदार्थाची पाककृती ?

– ‘बटाट्याचे काप’ ही सोपी पाककृती आहे, असं मला वाटतं. कापांना तिखट, मीठ, हळद लावायचं आणि रव्यात घोळून तळायची.



























































