स्वत:च्या दोषांवर त्याने ‘विजय’ मिळवला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत दामले

विजू, मी आणि प्रदीप, आम्ही तिघांनी ‘टुरटूर’ या नाटकापासून एकत्र काम करायला सुरुवात केली. ते साधारण 1983 साल असावे. आमची छान टीम झाली होती. त्यानंतर सुधीर भटांनी आचार्य अत्रे यांचे ‘मोरूची मावशी’ नाटक करायचे ठरवले. दिलीप कोल्हटकर यांच्या लक्षात आलं की, ‘मोरूची मावशी’ नाटकात प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धनला घेतलं पाहिजे. मग आम्हालाही घेतलं. पुन्हा आमचं त्रिकूट जमलं. ‘मोरूची मावशी’ धुमाकूळ घालू लागली. विजय चव्हाण लोकप्रिय झाला. टांग टिंग टिंगाक गाण्यातील शेवटच्या टुंगवर तो अशी काही करामत करायचा की प्रेक्षक लोटपोट व्हायचे. जणू काही त्या टुंगवर त्याने जग जिंकले. प्रत्येक प्रयोगाला त्याला वन्समोअर मिळायचा. विजयबद्दल बोलायचं तर त्याला त्याच्या उणिवा ठाऊक होत्या. गाण्यात तो कमी पडायचा, मात्र त्याच्या अंगात ऱ्हिदम होतं. त्याचा त्याने पुरेपूर वापर केला. कलाकाराला आपले दोष झाकता आले पाहिजेत. विजयला ते जमले आणि म्हणूनच मावशी अमर झाली.

‘मोरूची मावशी’ चे सुरुवातीचे 162 प्रयोग होईपर्यंत ते पूर्ण तोटय़ात होतं. त्यानंतर मात्र चमत्कार झाला. विनय आपटेने ‘टांग टिंग टिंगाक’ हे गाणे शूट करून दूरदर्शनवर एका कार्यक्रमात दाखवलं. त्याकाळी दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. बस्स, मग काय विचारता, नाटक जे काही उचचलं गेलं ते हजारो प्रयोगापर्यंत… विजू गाणं म्हणायचा, नाचायचा, परफॉर्म करायचा. नाचून नाचून त्याला धाप लागायची. तो हाशहुश करायचा. धम्माल असायची नुसती. आपल्यातील दोष झाकून जे आहे त्याचे सोनं कसं करायचं ते विजूनं दाखवलं. विजू स्वभावाने अतिशय सरळ. त्याच्या वाटय़ाला आऊटस्टँडिंग रोल आले असे काही झाले नाही. पण त्याचा स्वभाव इतका मनमिळावू, नम्र आणि सदैव इतरांना मदत करण्याची वृत्ती. त्यामुळे हातात मोबाईल नसूनही 35-40 वर्षे त्याला काम मिळाले.  विजूच्या जाण्याने साधा सरळ, मनमिळावू अभिनेता आपल्यातून निघून गेला.