
रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात रंगलेल्या सहाव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि सोनाली कुमारी यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब करत आपला दबदबा सिद्ध केला.
पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत माजी विश्वविजेता प्रशांत मोरेने एकतर्फी खेळ करत ठाण्याच्या संजय मांडेचा 25-10, 25-5 असा धुव्वा उडवला. तिसर्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या रहिम खानने मुंबईच्या निलांश चिपळूणकरवर 21-23, 15-14, 24-14 अशी मात केली.
महिलांच्या अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर सोनाली पुमारीने जबरदस्त पुनरागमन करत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरवर 12-25, 25-10, 25-5 असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत संजय मांडेने रहिम खानवर, तर प्रशांत मोरेने निलांश चिपळूणकरवर सहज विजय मिळवला.
सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम बोर्डवर प्रथमच झालेल्या या स्पर्धेत प्रशांत मोरे आणि सोनाली कुमारी यांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. विजेत्यांना दीपक जियांदानी, डॉ. दीपक मोंडकर, भालचंद्र बर्वे, मकरंद येडुलकर, राज्य कॅरम संघटनेचे अरुण केदार आणि संतोष चव्हाण यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले.































































