
सामना प्रतिनिधी, नागपूर
आपण स्वतः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अनुयायी आहे, असे सांगतानाच राम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येकडे बिनधास्त कूच करावी. देशातील तमाम हिंदू जनता ‘भगवा’ खांद्यावर घेऊन त्यांच्या सोबत येईल, अशी ग्वाही आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आज येथे दिली.
अयोध्येमधील श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी नुकतीच मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. दसऱयानंतर उद्धव ठाकरे हे तमाम शिवसैनिकांसोबत अयोध्येकडे कूच करणार आहेत. यासंदर्भात बोलताना तोगडिया यांनी उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. हिंदुस्थानला काँग्रेसमुक्त करायला निघालेला भाजप मशिदीच्या रस्त्यावरून ‘वॉलमार्ट’च्या रस्त्यावर गेला. पण त्या पक्षाला राम मंदिराचा रस्ता काही दिसला नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.
संघ आणि भाजपचे मुस्लिमीकरण सुरू झाले आहे, असा स्पष्ट आरोप करून तोगडिया म्हणाले की, पूर्वीचे सरसंघचालक निर्णय घ्यायचे. आता ‘मोदी चालक’ निर्णय घेत आहेत. सत्तेपुढे संघाची विचारधारा बदलली आहे. संघाची स्थापना हिंदूंच्या सन्मानासाठी आणि रक्षणासाठी झाली होती. पण आता तर ‘हिंदूं’ची व्याख्या बदलणे सुरू झाले आहे.
summary- pravin togadia speaks about uddhav thackeray and ram mandir






























































