राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोला अपघात, एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मानवत

तालुक्यातील कोल्हा पार्टीवर परभणी मानवत राष्ट्रीय महामार्ग वळणावर आज सकाळी 11 वाजता टोमॅटोने भरलेला आयशर टेम्पो पलटी झाला. यामध्ये वाहनचालक गंभीररित्या जखमी झाला असून क्लिन्नर किरकोळ जखमी झाला आहे. त्याला परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील कोल्हा येथे नवीन बायपास रस्ता झाला असून हा रस्ता धोकादायक ठरू लागला आहे. या रस्त्यावर अपघात नित्याने होत आहेत. आज 6 मे रोजी सकाळी 11 वाजता संभाजीनगर येथून परभणीकडे जात असताना कोल्हा पाटीवर राष्ट्रीय महामार्ग 61 बायपास वळणावर टोमॅटो भरलेला (एम.एच.20-डी ई 9079) आयशर टेम्पो पलटला. त्यात टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच कोल्हा परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ रूग्णवाहिका बोलावून चालकाला परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रमोद तारे, परमेश्वर भिसे, गोपाळ तारे, सिध्देश्वर भिसे, वैजनाथ भिसे आदी युवकांनी जखमींची मदत केली. टेम्पो व टोमॅटोचे लाखो रूपयांचे नूकसान झाले. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने हे बायपासचे काम केले होते. याठिकाणी बाजूला मोठा खोल खड्डा केला आहे. त्यामुळे हे वळण मृत्यूचा सापळा ठरत आहे.