
कांदिवली पश्चिम, चारकोपमधील ड्रेनेज लाइन, रस्ते आणि मेट्रोमुळे खोदलेल्या मार्गांसह सर्व पावसाळापूर्व कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत. शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी शुक्रवारी संबंधित सर्व कामांची पाहणी केल्यानंतर पालिकेसह, मेट्रो प्रशासनाने ही कामे ताडतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
पावसाळा अवघा काही दिवसांवर आला असला तरी कांदिवली, चारकोपमधील अनेक पावसाळापूर्व कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग क्र. 2चे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी पावसाळापूर्व कामांची पाहणी करून आढावा घेतला. विभागातील लिंक रोडजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून या ठिकाणची ड्रेनेज लाइन फुटल्यामुळे पावसाळ्यात रहिवाशांना त्रास सहन करावा लागण्याचा धोका आहे. रस्ते खोदलेले असल्यानेही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे विभागाचे डीएमसी एम. सी. शंकरवार, मेट्रोचे अधिकारी, आर दक्षिण वॉर्डचे अधिकारी शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ड्रेनेजची कामे, चेंबरची कामे, खोदलेल्या रस्त्यांसह सर्व शिल्लक कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. विभागातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर आणि नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या पाठपुराव्यातून काम सुरू असल्याचे सुधाकर सुर्वे यांनी सांगितले.




























































