पावसाळ्यापूर्व कामांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना शिवसेनेची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यापूर्वी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथील नाल्यांची जोडणी वेळेत करुन या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच रहिवाशांची होणारी गैरसोय टाळा, अशी सूचना आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. पावसाळापूर्व कामांच्या पार्श्वभूमीवर, घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे सध्या मेट्रोचे 6 तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे तर रस्ता रुंदीकरणाचे काम मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच मल:निस्सारण वाहिनी, पर्जन जलवाहिन्या यांची कामेही करण्यात येत आहेत. परंतु ही कामे अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने पावसाळ्यात पादचारी, चालक आणि रहिवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते, याकडे के-पूर्वचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना पत्र लिहून वायकर यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर पावसाळ्या अगोदर तोडगा काढण्यासाठी वायकर यांनी के-पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला नगरसेवक बाळा नर, जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, जोगेश्वरी विधानसभा महिला संघटक रचना सावंत, शाखाप्रमुख मंदार मोरे, सहाय्यक अभियंता मोरे, रस्ते विभागाचे सोनवणे, सेक्शन इंजिनिअर गजानन धाडवे, संदीप कोल्हे, पी. एल. माळवदे, पराग शेख, उपअभियंता नारकर आदी अधिकारी उपस्थित होते.

मजास डेपो येथील कामाला गती द्या!

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील रस्ते रुंदीकरणाच्या कामाचा वेग वाढवण्यात यावा, येथील वेरावली जलाशय, दुर्गानगर, मजास बेस डेपो तसेच श्यामनगर रस्त्याखालील मल:निस्सारण वाहिनी, पर्जन जलवाहिन्या यांची येत्या पावसाळ्यापूर्वी जोडणी करण्यात यावी तसेच मजास डेपो येथील रखडलेल्या कामाला गती देण्यात यावी, अशी सूचना वायकर यांनी बैठकीत केली.