हिंदुस्थानात ऑलिम्पिक आयोजनाची तयारी सुरू, 2036 साली क्रीडा महोत्सवाचा मान मिळवण्यासाठी फिल्डिंग

हिंदुस्थानात ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथे ऑलिम्पिक आयोजनाच्या तयारीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनकडून 2036 सालातील ऑलिम्पिक आयोजनाचा मान मिळावा यासाठी बोली लावण्यात येणार आहे.

टेंडर जाहीर

अहमदाबादमधील शहरी विकास प्राधिकरणाकडून मंगळवारी टेंडर काढण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाला साजेशा स्टेडियम्सची उभारणी आणि इतर सुविधांसाठी हा टेंडर जाहीर करण्यात आला आहे. ज्या एजन्सीला हे काम देण्यात येईल त्यांना तीन महिन्यांमध्ये आपला रिपोर्ट सादर करावा लागणार आहे.

टोकियोत रंगणार धमाका

यंदाचे टोकियो ऑलिम्पिक 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे. यात 205 देशांतील 11 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. याप्रसंगी जगभरातील खेळाडू 33 खेळांच्या 339 क्रीडा शर्यतींमध्ये पदकावर मोहोर उमटवण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.

पुढील दोन ऑलिम्पिक पॅरीस व लॉज एंजिलीसमध्ये

कोरोनामुळे 2020 सालचे टोकियो ऑलिम्पिक यंदा (2021) 23 जुलैपासून आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर 2024 साली फ्रान्समधील पॅरीस शहरात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 2028 सालामधील ऑलिम्पिक आयोजनाचा मान अमेरिकेतील लॉस एंजिलीस या शहराला मिळाला आहे. 2032 सालातील ऑलिम्पिक आयोजनाचे शहर अद्याप ठरलेले नाही. या वर्षी 21 जूनपर्यंत 2032 सालातील ऑलिम्पिक आयोजनाचे स्थळ निश्चित करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहर हे 2032 सालातील ऑलिम्पिक आयोजनासाठी पहिल्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या