
नगर जिल्हा परिषद कर्मचाऱयांच्या बदल्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे. कर्मचाऱयांच्या प्रारूप सेवाज्येष्ठता यादीवर हरकती घेण्यासाठी सोमवार, 24 एप्रिल ही शेवटची तारीख होती. त्यानंतर प्रत्येक विभागाचे कक्ष अधिकारी आणि अधीक्षकांनी कर्मचाऱयांच्या याद्या काटेकोरपणे तपासून घ्याव्यात, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली आहे.
नगर जिल्हा परिषद कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची आहे. या पार्श्वभूमीवर काल उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कक्ष अधिकारी आणि अधीक्षकांची बैठक घेतली. यात कर्मचाऱयांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम करण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या.
बैठकीनंतर कोहिनकर म्हणाले, ‘जिल्हा परिषदपातळीवरील सर्व तयारी करण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ात 2 मे रोजी कर्मचाऱयांची विभागनिहाय सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सेवाज्येष्ठता यादीत चुका आणि त्रुटी नकोत, यासाठी सर्व विभागाचे कक्ष अधिकारी आणि अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. साधारणपणे 20 मेपर्यंत कर्मचाऱयांच्या बदल्या होण्याची शक्यता असून, बदल्यांचे प्रमाण ठरविणारे पत्र अद्यापि ग्रामविकास विभागाकडून आलेले नाही. त्या पत्राची प्रतीक्षा असून, त्यात येणाऱया प्रशासकीय, विनंती बदल्यांच्या प्रमाणानुसार कर्मचाऱयांच्या बदल्या पादर्शकपणे आणि समुपदेशनाने पार पडणार आहेत. प्रशासनाच्या कामाच्या दृष्टीने आणि कर्मचाऱयांच्या सोयीनुसार नियमात बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे यावेळी सामान्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ऑनलाइन बदल्या हा नगरचा पॅटर्न
राज्यात शिक्षकांच्या आणि कर्मचाऱयांच्या ऑनलाइन बदल्यांचा प्रयोग सर्वप्रथम नगर जिल्हा परिषदेत झालेला आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी केंडीराम नागरगाजे यांनी सर्वप्रथम नगरमध्ये अशा प्रकारे कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपातळीवर त्याचा गवगवा होऊन राज्यपातळीवरून आता ऑनलाइन, सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशनाने कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडत आहे.


























































