
हिंदुस्थानी लष्करासाठी आता 800 किमीपेक्षा जास्त लांब पल्ल्याची सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्याची तयारी हिंदुस्थान सरकारकडून सुरू आहे. सध्या हिंदुस्थानी लष्कराकडे केवळ 450 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्यास मंजुरी दिली जाऊ शकते. याला मंजुरी मिळाली तर हिंदुस्थानच्या टप्प्यात पाकिस्तानातील संपूर्ण इस्लामाबाद येऊ शकते.
संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावाला लवकरच मंजुरी दिली जाऊ शकते. मे 2025 मध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धादरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान हवाई दलाच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले होते. आता 800 किमी पल्ल्याच्या नवीन क्षेपणास्त्रांच्या आगमनानंतर दिल्लीतूनच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य करता येईल. दिल्ली आणि इस्लामाबादमधील हवाई अंतर 700 किमी आहे, तर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रची मारक क्षमता 800 किलोमीटरपर्यंतची आहे. हिंदुस्थानी सैन्य एक समर्पित क्षेपणास्त्र दल तयार करण्यावर आणि क्षेपणास्त्रांची संख्या वाढवण्यावर हिंदुस्थान लष्कर काम करत आहे. सैन्य आपल्या कार्यशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोनचे उत्पादनही करत आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे महत्त्व जगभरात आणखी वाढले आहे. ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र हा हिंदुस्थान आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे, ज्याचा बहुतांश भाग आता स्वदेशी झाला आहे. हे क्षेपणास्त्र लष्कर, हवाई दल आणि वायुदल अशा तिन्ही सेनांकडे आहे व ते हवा, समुद्र आणि जमिनीवरून हल्ला करण्यासाठी वापरले जाते. ब्रह्मोस हे हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राइज एनपीओएम यांच्यातील संयुक्त करारानुसार विकसित करण्यात आले आहे.


























































