
मुंबईत जमिनीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. तरीदेखील मागील काही काळापासून मुंबईत जमिनींचे महागडे सौदे पार पडत आहेत. त्यामुळे मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट अत्यंत तेजीत आहे. आणि या महागड्या सौद्यांमधून शासनाच्या तिजोरीत महसूल देखील चांगल्या प्रमाणात जमा होत आहे. पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स स्थानकाजवळ असलेल्या एस के पाटील उद्यानाशेजारी असणारा भूखंड तब्बल 704 कोटींना विकला गेला आहे. प्रेस्टीज ग्रुपने 704 कोटींना ही 2.3 एकर जमीन खरेदी केली आहे. या भूखंडावर 55 मजल्याचे दोन आलिशान टॉवर्स उभे राहणार आहेत. सी फेसिंग असणाऱ्या या प्रकल्पाला प्रेस्टिज ओशन टॉवर्स असे नाव दिले जाणार आहे. महालक्ष्मी येथील दोन प्रकल्पांनंतर दक्षिण मुंबईतील त्यांचा हा तिसरा प्रकल्प असणार आहे.
गेल्या 15 वर्षांत, अनेक विकासकांनी डीबी रियल्टी समूहाच्या नियंत्रणाखाली असलेला हा 2.3 एकरचा भूखंड विकसित करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यात अयशस्वी झाले. प्रेस्टीज ग्रुपच्या म्हणण्यानुसार समुद्राभिमुख असलेल्या या भूखंडाची 5 लाख चौरस फूट 5,000 कोटी रुपयांची विकसन क्षमता असेल. या भूखंडावर 300 मीटर उंचीचे दोन हाय-एंड निवासी टॉवर बांधण्याची योजना आहे.
प्रेस्टीज आणि डीबी रियल्टी यांनी एप्रिलमध्ये हा करार पूर्ण केला. खरेदीदाराने यासाठी 42 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क भरले.

































































