
एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले असून. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आजपासून 135 रुपयांनी कमी झाली आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर काहीप्रमाणात स्वस्त झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे गृहिणींना महागाईतून कोणताच दिलासा मिळाला नसल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे आता सुधारित दरांनुसार मुंबईत 2,306 ऐवजी 2,171 रुपयांना उपलब्ध असणार आहे. चेन्नईमध्ये 2,507 ऐवजी 2,373 रुपयांना, दिल्लीत 2,354 ऐवजी 2,219 रुपये आणि कोलकात्यात 2,454 ऐवजी 2,322 रुपयांना उपलब्ध असणार आहे.
मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोनदा धक्का बसला होता. 7 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि 19 मे रोजीही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी एलपीजीच्या दरात झालेल्या बदलामुळे घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला. मात्र 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. 19 मे रोजी त्याचे दर आठ रुपयांनी वाढले होते.
























































