प्राथमिक शिक्षक समितीचे आज जिल्हाभरात धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमार्फत आज आंदोलन करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी, प्रांत ऑफिस चिपळूण व तहसीलदार कार्यालय दापोलीसमोर आज 8 ऑगस्ट दुपारी 3 ते 5 वेळेत हे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे यांनी दिली.

राज्यभरात इतर शिक्षक संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून त्यांचा आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यासाठी शासनस्तरावर दररोज नवनवीन पत्रे, आदेश दिले जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे. यामुळे आम्हाला शिकवू द्या हो यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यभरात प्राथमिक शिक्षकांची हजारो पदे रिक्त असूनही ती भरण्याबाबत कोणतीही कार्यवाही दिसून येत नाही. केंद्रप्रमुखांची 4860 पैकी 70 टक्के पदे रिक्त असून त्यांचा पदभार सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षक, सहशिक्षक यांच्याकडे देण्यात आलेला आहे. यामुळे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यवेक्षीय यंत्रणा विविध उपक्रमांच्या विविध नोंदी, लिंक, फोटो अपलोड करणे, अहवाल सादर करणे याद्वारे त्याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांनाच वेठीस धरत आहे. यामुळे या नोंदी ऑनलाइन-ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करून शिक्षक मेटाकुटीस आले आहेत. 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतही शासनाची भूमिका नकारात्मक दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखेने राज्यभरात धरणे आंदोलन करण्याची नोटीस शासनाला 25 जुलै 2022 रोजी दिली आहे. धरणे आंदोलनात विविध 38 मागण्या समाविष्ट आहेत.

शिक्षण सेवकांचे मानधन पूर्वलक्षी प्रभावाने किमान 25000/- करावे. 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. BLO सह सर्व अशैक्षणिक कामे बंद करावीत. शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी. प्राथमिक शाळांना मोफत वीज, पाणी यासह इंटरनेट सुविधा पुरविण्यात यावी. यासाठी जिल्ह्यात दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी या ठिकाणी शिक्षक समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीमार्फत सरचिटणीस संतोष सुर्वे आणि संघटना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.