
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी सुलतानपूर येथे एकत्र होते. इथे आयोजित कार्यक्रमात पूर्वांचल एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी हे त्यांच्या गाडीत बसून जात असून या गाडीभोवती सुरक्षारक्षकांचे कडे आहे. योगी आदित्यनाथ हे मात्र या गाडीपासून लांब, पाठीमागून एकटेच चालत जात असल्याचं दिसतं आहे.
आपचे संजय सिंह आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. संजय सिंह यांनी म्हटलंय की ‘ये व्यवहार तो CM साहेब के साथ ठीक नहीं’ तर अखिलेश यादव यांनी ही संधी साधत पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका केली आहे.
तुमने हमारी आवभगत का अच्छा सिला दिया
जनता से पहले तुमने ही हमें ‘पैदल’ कर दियाबड़े बेआबरू होकर इन सड़कों से हम गुजरे… pic.twitter.com/iVpp447Bwn
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 16, 2021
अखिलेश यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की ‘तुमने हमारी आवभगत का अच्छा सिला दिया,जनता से पहले तुमने ही हमें ‘पैदल’ कर दिया. बड़े बेआबरू होकर इन सड़कों से हम गुजरे…’
नेमकं काय झालं ?
अखिलेश यांनी ट्विट केलेला व्हिडीओ 6 सेकंदांचा आहे. या व्हिडीओत पंतप्रधान मोदी त्यांच्या गाडीत बसलेले दिसत असून त्यांच्या गाडीच्या अवतीभोवती सुरक्षारक्षकांचे कडे आहे. पाठोपाठ योगी आदित्यनाथ हे त्यांच्या गाडीच्या दिशेने चालत जात आहेत. याबाबतचं वृत्त नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
पूर्वांचल एक्प्रेस वे योगींना फलदायी ठरणार?
मायावतींनी बांधलेल्या यमुना एक्प्रेस वेचे उद्घाटन समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीनंतर केले. यूपीच्या एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत एक्प्रेस वेचे जाळे टाकण्याच्या दृष्टिकोनातून काम पुढे नेत त्यांनी यमुना द्रुतगती मार्गासमोर आग्रा-लखनौ एक्सप्रेस वेचा पायाच घातला आणि निवडणुकीच्या एक वर्ष आधी त्याचे उद्घाटनही केले; पण त्यांचा निवडणुकीचा निकाल मायावतींसारखाच लागला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यांच्या पक्षाला सत्ता गमवावी लागली होती.
उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मार्ग ज्या पूर्वांचलमधून जातो तेथील मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न तेथील सत्ताधाऱयांनी नेहमीच केला. बसपा नेत्या मायावती यांनी त्यांच्या कार्यकाळात ‘यमुना एक्सप्रेस वे’ निर्माण केला, पण विधानसभा निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. सपा नेते अखिलेश यादव यांनी ‘आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे’ची निर्मिती केली, मात्र त्यांना सत्ता गमवावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला ‘पूर्वांचल एक्सप्रेस वे’ मुख्यमंत्री योगींना फलदायी ठरणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
पूर्वांचलमधील 117 जागांवर निवडणुकीत कोणाचाही वरचष्मा करण्याची आणि कोणाचीही अवस्था बिघडवण्याची ताकद आहे. 2007 मध्ये पूर्वांचलमध्ये बसपाने मोठा विजय मिळवला तेव्हा मायावती पहिल्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार बनवण्यात यशस्वी ठरल्या. यानंतर 2012 मध्ये पूर्वांचलमध्ये मोठा विजय मिळवून अखिलेश यादव यांनी पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. पूर्वाचलमधील जनता भाजपच्या पाठीशी उभी होती, तेव्हा यूपीमध्ये 2017 मध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. ‘पूर्वांचल एक्प्रेस वे’ च्या निर्मितीनंतर भाजप आणि योगी सरकारने पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगणे स्वाभाविक आहे.
मोदींचे सुपर हरक्युलिस विमानाने ‘लॅण्डींग’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सुल्तानपूरमध्ये पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे लोकार्पण केले. या सोहळ्याआधी पंतप्रधान हवाई दलाच्या सुपर हरक्युलिस विमानातून पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर उतरले. हरक्युलिसमधून एक्स्प्रेस वेवर लॅण्डींग करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.