दांडीबहाद्दर मंत्र्यांची पंतप्रधान मोदी हजेरी घेणार

32

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

संसदेच्या अधिवेशनाच्या काळात लोकसभा आणि राज्यसभेत न फिरकणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. सगळ्यांना ताळ्याकर आणणं मला चांगलंच जमतं. दांडीबहाद्दर मंत्र्यांची नावे संध्याकाळपर्यंत आपल्याला देण्यात यावी. अधिवेशनाच्या काळात गैरहजेरीसाठी कोणतीही कारणे चालणार नाहीत. मंत्री, खासदारांनी सभागृहात हजर राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक मंगळवारी दिल्लीत झाली.  या बैठकीदरम्यान मंत्र्यांच्या कामकाज पद्धतीकरून मोदी आक्रमक झाले. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन-दोन तासांची डय़ुटी लावली जाते, पण अनेकदा मंत्री सभागृहात येत नाहीत. त्यामुळे विरोधक पत्र लिहून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करत असल्याकडे त्यांनी सर्वांचे बैठकीत लक्ष वेधले. जे मंत्री गैरहजर राहतात त्यांच्या नावांची यादी संध्याकाळपर्यंत आपल्याला देण्यात यावी, असे आदेश त्यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना दिले.

टीबीसारख्या आजारावर मिशन मोड पद्धतीने काम करा

टीबीसारख्या आजारावर ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे. मिशन मोड म्हणून हे कामे हाती घेण्यात यावे. त्याचबरोबर देशासमोर पाण्याचे मोठे संकट असून त्यासाठीही खासदारांनी काम करावे. देशातील 115 मागास जिह्यांमध्ये विकासकामे करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी बैठकीत सांगितले.

राजकारणाबरोबर सामाजिक कार्यात सहभागी व्हा

खासदारांनी फक्त राजकारणाशी संबंधित राहता कामा नये. राजकारणाबरोबर सामाजिक कार्य व इतर गोष्टींमध्येही सहभागी झाले पाहिजे. सरकारी योजनांची माहिती आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांना दिली पाहिजे. तसेच आपल्या मतदारसंघांमध्ये नवीन काहीतरी करून दाखवा. अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे, अशा सूचना मोदी यांनी दिल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या