
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला गॅस योजनचा गाजावाजा मोदी सरकार करत असलं तरी त्यामागील सत्य आता समोर आलं आहे. या योजने अंतर्गत मिळणारा गॅस मोफत नाही आणि त्याला सबसीडी देखील नाही (मार्च २०१८पर्यंतची माहिती). यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या महिलांची फजिती झाली आहे. अखेर सरकारने सबसिडी वसूल करण्याचे टाळले आहे.
हिंदी वृत्तपत्र जनसत्ताने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन घेताना १७५० रुपये भरावे लागतात. यामध्ये ९९० रुपये गॅस शेगडीसाठी तर ७६० रुपये गॅस सिलिंडरसाठी द्यावे लागतात. सरकारकडून दावा केला जातो की प्रति कनेक्शन गॅस ग्राहकाला १६०० रुपये सबसीडी देण्यात येते. मात्र प्रत्यक्षात असे होत नाही. कारण पहिल्या सहा महिन्यांची सबसीडी सरकार स्वत:कडे ठेवते. म्हणजे १६०० रुपये देण्यात आलेली सबसीडी (एखाद्या कर्जाप्रमाणे) चुकती करून घेता यावी. सरकार फक्त १५० रुपयाचे रेग्युलेटर फ्री देते. या योजनेच्या लाभार्थ्यांना पितळ ऐवजी लोखंडाचा बर्नर असलेली शेगडी दिली जाते. गॅस पाईपही अगदी छोटाच दिला जातो. महत्वाचे म्हणजे उज्ज्वला योजनेचे पहिले ६ सिलिंडर हे बाजार भावाने खरेदी करावे लागतात. ज्यासाठी ७५० ते ९०० रुपये खर्च करावे लागतात. सर्वसाधारण २४० ते २९० रुपये सबसीडी दिली जाते. याप्रमाणे सरकार पहिल्या सहा महिन्यांत प्रति ग्राहक १७४० रुपये वसूल करते.
सरकारच्या योजनेतील हे सत्य कळल्याने बहुदा या योजनेतील अनेक ग्राहक दुसऱ्यांदा सिलिंडर रिफील करत नाहीत. ५० टक्के ग्राहक दोन-तीन महिन्यांत रिफील करतात. सरकारची ही योजना फेल गेल्यानंतर सरकारने एप्रिल २०१८ पासून १७५० रुपयांची सबसीडी रिकव्हरी सध्या टाळली आहे. याआधी योजनेनुसार कर्जाची रक्कम वसूल झाल्यानंतरच ग्राहकांना सबसिडी देण्याचा विचार होता.






















































