शर्टलेस होत तुरुंगात घुसण्याचा तरुणाचा प्रयत्न, कारण ऐकाल तर तुम्ही हैराण व्हाल

3193

प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणतात ते उगाच नाही. एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तुरुंगात घुसण्याचा प्रयत्न केला. तुरुंगाच्या भिंतीवर लावलेल्या तारांच्या जाळीमुळे कपडे फाटू नये यासाठी त्याने शर्टही काढून टाकला होता. या तरुणाचं आणि त्याच्या प्रेयसीचं भांडण झालं होतं आणि तिने प्रियकरापासून फारकत घेण्याचं ठरवलं होतं. यामुळे सैरभैर झालेल्या प्रियकराने थेट तुरुंगात जाऊन प्रेयसीची मनधरणी करण्याचं ठरवलं होतं.

प्रियकराचे आणि त्याच्या प्रेयसीचे नाव कळू शकलेले नाहीये मात्र हे दोघेही 18 वर्षांचे असल्याचं जर्मनीतल्या माध्यमांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. लोअर सॅक्सोनी भागात असलेल्या वेचटा भागात तरुणांसाठीचा तुरुंग आहे. या तुरुंगामध्ये तरुणीला डांबण्यात आले आहे. तिची मनधरणी करण्यासाठी प्रियकराने 13 फूट उंच भिंतीवर चढून तुरुंगाच्या आवारात शिरण्याचं ठरवलं होतं. त्याच्या प्रेयसीला पहिल्या जमल्यावर ठेवण्यात आलं आहे. तुरुंगाच्या भिंतीला लागून असलेल्या दिव्याच्या खांबाच्या सहाय्याने हा तरुण तुरुंगाच्या संरक्षक भिंतीवर चढला. भिंतीवर कोणीतरी चढल्याचं पाहून सुरक्षारक्षत सतर्क झाले होते. थोड्याचवेळात तिथे अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवान शिडीच्या सहाय्याने तरुणापर्यंत पोहोचले आणि त्यांनी समजूत घालून तरुणाला खाली उतरवलं.

ही घटना घडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने हा तरुण ज्या दिव्याच्या खांबावरून संरक्षक भिंतीवर चढला होता त्या खांबाला काटेरी तारेचा वेढा घातला आहे. या तरुणाने रितसर परवानगी घेऊन प्रेयसीला भेटण्याचा प्रयत्न का केला नाही हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या तरुणाविरूद्ध काही कारवाई झाली आहे का याबाबत माहिती मिळालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या