
न्यायालयात अनेक खटले प्रलंबित असतात. काही खटले हे वर्षानुवर्षे चालतात. या खटल्यांवरील सुनावणी वेळेत पूर्ण होत नाही त्यामुळे आरोपींना तुरुंगात खितपत पडावे लागते, अशी खंत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने आज बोलून दाखवली.
इस्लामिक देशातल्या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याच्या आरोपावरून एका 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. इक्बाल अहमद कबीर अहमद असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या अहमदला चार वर्षांपूर्वी दहशतवादी कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य आरोपांत अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचा सदर प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचा दावा करत अॅड. मिहिर देसाई यांनी जामीन मंजूर करण्याची खंडपीठाकडे मागणी केली. पोलिसांनी नोंदविलेल्या गुह्यानुसार परभणी येथे दहशतवादी हल्याचा कट आखण्यात आला होता. एटीएसने हा कट उधळून लावत आरोपींना अटक केली. चार वर्षे लोटूनही अद्याप खटला सुरू झालेला नाही. तब्बल दीडशे साक्षीदार असून काहींचे जबाब अद्याप नोंदविण्याचे बाकी आहे असे वकिलांनी सांगितले. या दिरंगाईमुळे आपला अशील मात्र तुरुंगात खितपत पडला आहे. त्यामुळे त्याला सोडण्यात यावे असा युक्तिवाद अॅड. देसाई यांनी केला. त्यावर आरोपीविरोधात सबळ पुरावे असून तो अन्य आरोपींबरोबर इसिस संघटनेत सामील होणार होता, असा आरोप सरकारी वकिलांकडून करण्यात आला. दरम्यान, खंडपीठाने दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला व निकाल राखून ठेवला.


























































