
राज्यातील विविध कारागृहांत असलेल्या कैद्यांना आता श्रीखंड, आमरस पुरी, मासे, चिकन, ड्रायफ्रूट, ज्यूससह विविध खाद्यपदार्थ मिळणार आहेत. रेस्टॉरंटच्या धर्तीवर ठिकठिकाणच्या कारागृहातील कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ ठेवले जाणार आहेत. त्याशिवाय कैद्यांना हेअर प्रॉडक्टही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, राज्यातील कारागृहात दिवसेंदिवस क्षमतेपेक्षा जास्त बंदिवान वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, हिंगोली, पालघर आणी गोंदिया शहरांमध्ये नव्याने कारागृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिल्याचे त्यांनी सांगितले.
कारागृहांतील कॅण्टीनमध्ये अंडी, दूध, बेकरी उत्पादने उपलब्ध होती. खाद्यपदार्थांमध्ये वाढ करण्यात आली असून रेडी टु इट प्रॉडक्टचाही समावेश करण्यात आला आहे. मासे, चिकन, मिठाई, सोनपापडी, ड्रायफ्रूट, कचोरी, समोसा, पनीर, विविध प्रकारचे ज्यूस, अंडाकरी, मिनरल वॉटर, फळे, शुद्ध तूप पदार्थांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय कोरोना काळात कैद्यांना प्रोटिन आणि व्हिटॅमिन असलेला डाएट देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. खाद्यपदार्थांची खरेदी करताना कैद्यांना कामातून जमा झालेल्या पैशांचा वापर करता येणार आहे.
चेंबूर जेलमध्ये 5 हजार कैदी
मुंबईच्या आर्थर रोड कार्यालयाची क्षमता 800 असताना तेथे 1 हजार 600 बंदी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत तातडीने नव्या कारागृहाची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला चेंबूरच्या महिला व बालकल्याण विभागाची जागा मिळाली आहे. तेथे अंडरट्रायल बंद्यांसाठी मल्टिस्टोअर कारागृह बांधण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पाच हजार बंदी राहू शकतील इतकी क्षमता आहे. त्याशिवाय पुण्यातील येरवडा कारागृह हे ऐतिहासिक कारागृह असून तेथे 2 हजार 500 बंदी आहेत. त्या परिसरात आणखी एका कारागृहाचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे.
































































