
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणांमुळे आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या खासगी शिक्षण संस्थांनी शुक्रवार, 2 नोव्हेंबरला ऐन सहामाही परीक्षेतच शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील खासगी शाळा या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. सततच्या अशैक्षणिक धोरणामुळे खासगी शिक्षण संस्था सद्य परिस्थितीत अडचणीत आल्या आहेत. राज्यभरातील स्थानिक सर्व माध्यमाच्या शाळा, कनिष्ठs महाविद्यालये, शिक्षक-मुख्याध्यापक संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे एकदिवसीय आंदोलन असेल या आंदोलनाची दखल न घेतल्यास नजीकच्या काळात बेमुदत आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष डॉ. विनय राऊत यांनी सांगितले. काही शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रथम सत्रातील तोंडी आणि लेखी परीक्षा सुरू असून या एका दिवसाच्या बंदमुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

























































