प्रासंगिक – ललिता पवार

>> प्रिया भोसले

पांढऱया रंगाचं अस्तित्व जसं काळ्या रंगामुळे ठसठशीतपणे नजरेत भरतं, अगदी तसं चित्रपटातला नायक किंवा नायिका यांचा चांगूलपणा बिंबवण्यासाठी खलनायक किंवा खलनायिका महत्त्वाचे ठरतात. नायकप्रधान सिनेमांची पूर्वीपासून चलती असल्यामुळे नायकासोबत खलनायकही तितकेच प्रसिद्ध झाले. नायिकाप्रधान चित्रपट जरा उशिरा आल्यामुळे आणि त्यांची संख्या ही कमी असल्यामुळे खलनायिका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या प्रसिद्ध झाल्या, पण त्यांचा दबदबा आजही पुरुष खलनायकांइतकाच टिकून आहे. बिंदू, नादिरा, मनोरमा,अरुणा इराणी, हेलेन, शशिकला, पद्मा खन्ना, कल्पना अय्यर… नुसती नावे जरी घेतली तरी त्यांच्या अनेक भूमिका नजरेसमोर तरळतील. याच यादीत अतिशय महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे ललिता पवार !

माणूस चांगला किंवा वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट मार्गाला लावते अशी विचारसरणी दृढ असताना चित्रपटांतून खलनायक/नायिका संकल्पना जम बसवू लागली. त्याला भक्कम हातभार लावणारे प्राण, अमजद खान, जीवन, प्रेम चोपडासारख्या मातब्बर कलाकारांमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान पटकावणारी कलाकार म्हणून ललिता पवार यांचं नावं घेतलं जातं. त्यांनी साकारलेल्या अनेकोत्तम भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत. कजाग, खाष्ट सासू म्हणजे ललिता पवार आणि ललिता पवार म्हणजे कजाग खाष्ट सासू हे समीकरण पिढय़ान्पिढय़ा घट्ट होतं गेलं.
अभिनयाच्या प्रवासात कधी खलनायिका, तर कधी चरित्र अभिनेत्री म्हणून प्रत्येक भूमिकेत ललिताबाई आपली छाप पाडत गेल्या.

सिनेमा म्हणजे रामलीलासारखा प्रकार असणार असा विचार करून त्यांनी नऊ वर्षांची असताना ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटात बालकलाकार म्हणून अभिनयाचा श्रीगणेशा केल्यानंतर पुढे अनेक मूकपटांत काम केलं. भारतीय चित्रपटांवर पाश्चात्त्य सिनेमांचा पगडा असल्यामुळे आणि सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे वीसच्या आणि तीसच्या दशकात बऱयाच चित्रपटांत सर्रास बोल्ड दृश्ये, चुंबन दृश्ये असत. ललिता पवार यांनीदेखील त्या वेळी ‘हिम्मत-ए-मर्दा मदद-ए-खुदा’ चित्रपटात अशी दृश्ये दिली होती. साहसदृश्यांचा अंतर्भाव असलेले चित्रपट केले. ‘नेताजी पालकर’, ‘संत दामाजी’, ‘अमृत’, ‘गोरा पुंभार’ या यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करत असताना त्यांनी काही सिनेमांची निर्मितीही केली. नायिका आणि चित्रपट निर्माती म्हणून हा यशस्वी प्रवास असाच सुरू राहिला असता, जर तो अपघात झाला नसता. ‘जंग-ए-आजादी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका दृश्यात भगवानदादा यांनी त्यांच्या जोरात कानाखाली मारल्यामुळे त्यांचा एक डोळा आणि चेहऱयाची एक बाजू अधू झाली. त्यामुळे नाइलाजाने त्यांना चरित्र अभिनेत्रीच्याच भूमिका कराव्या लागल्या. त्याही परिस्थितीत हार न मानता डोळ्यातील दोषाचा अभिनयात वापर करून त्यांनी खलनायिकी भूमिकेला नवा आयाम दिला. त्या भूमिकांसोबत त्यांनी साकारलेल्या चरित्र भूमिकाही तितक्याच गाजल्या. ‘अनाडी’मधली मिसेस डिसा, ‘आनंद’मधली मेट्रन , ‘श्री 420’मधली गंगाबाई…धाकयुक्त प्रेमाचा आविष्कार असलेल्या या तीनही व्यक्तिरेखा संस्मरणीय ठरल्या.

मिसेस डिसाची भूमिका तर अजरामर झाली. ताप नसताना शरीराचं तापमान वाढवून खरा अभिनय काय असतो हे दाखवून दिलेला किस्सा तर सर्वश्रुत आहे. या घटनेनंतर त्यांच्यातल्या उत्कट अभिनयाचा आविष्कार बघून भले भले कलाकार त्यांच्यासमोर बिचकायला लागले होते. गुरुदत्त यांच्या ‘मिस्टर अँड मिसेस 55’ चित्रपटातील सीतादेवी, ‘जंगली’मधली कडक शिस्तीची आई, ‘कोहरा’मधली दाई मां, ‘बॉम्बे टू गोवा’मधली सदैव अंगात येऊन घुमणारी काशीबाई, ‘परवरीश’मधली ठकुराईन, ‘प्रोफेसर’मधली सीतादेवी, ‘सौं दिन सास के’मधली भवानीदेवी आणि ‘रामायण’ मालिकेतील मंथरा या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत. ‘रामायणा’त बरेच कलाकार नवोदित होते, पण मंथरेच्या भूमिकेत ललिताबाई असाव्यात ही लोकांच्या मनातली गोष्ट हेरून रामानंद सागर यांनी त्यांची निवड केली, जी प्रमाणाबाहेर यशस्वी ठरली. इतर व्यक्तिरेखा कोण आहेत यापेक्षा मंथरेची भूमिका ललिताबाईंना मिळाली याचा त्या वेळी लोकांना फार आनंद झाला होता.
आजच्या सिनेमात व्हॅम्प, खलनायिका ही संज्ञा पूर्णपणे मोडीत निघालेली बघताना सिनेसृष्टीचा तो काळ आठवतो, ज्यात खलनायिकेशिवाय चित्रपट अधुरा असायचा. अपुऱया कपडय़ांत पॅबरे करणाऱया व्हॅम्प रुपेरी पडदा गाजवत होत्या आणि त्याच काळात शुभ्र पांढऱया साडय़ा नेसून करारी नजरेने बघणाऱया ललिताबाईंच्या भूमिकेवरही लोक भीतीयुक्त प्रेम करत होते. जवळ जवळ सात दशपं गाजवलेल्या या महान अभिनेत्रीला लोक कधीच विसरले नाहीत. उलट आजही वाईट वागणाऱया एखाद्या स्त्राrला ‘ललिता पवार’ नावाने सबोधलं जातं हा त्यांच्या अभिनयाचा एक प्रकारे गौरवच म्हणू शकतो.

सात दशकांचा चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ प्रवास म्हणून गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद असणाऱया ललिताबाईंचा 18 एप्रिल जन्मदिन. कोणत्याही भूमिकेचा विचार करताना लेंग्थपेक्षा भूमिकेच्या स्ट्रेंग्थला महत्त्व देऊन ती तितक्याच उत्कटतेने साकारणाऱया या थोर अभिनेत्रीला मनापासून वंदन!

[email protected]