अर्थव्यवस्था सुधारणे हे सरकारचे काम, कॉमेडी सर्कस चालवणे नाही!

पूर्णपणे कोलमडलेली अर्थव्यवस्था सुधारणे हे सरकारचे काम आहे, कॉमेडी सर्कस चालवणे नाही अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना टोला लगावला. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यावर गोयल यांनी टीका केली होती. या टीकेला प्रियंका यांनी उत्तर दिले.

बॅनर्जी यांनी ‘न्याय’ या योजनेला पाठिंबा दिला होता. या योजनेअंतर्गत महिन्याला 12 हजार रुपयांहून कमी पैसे कमावणाऱया कुटुंबांच्या खात्यात महिन्याला सहा हजार रुपये जमा करण्यात येणार होते, परंतु मतदारांनी ही योजनाच नाकारली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या योजनेचा उल्लेख होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बॅनर्जी यांच्यावर टीका केली. बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे असल्याचेही ते म्हणाले होते. गोयल यांच्या टीकेला प्रियंका यांनी आज शनिवारी उत्तर दिले. अर्थव्यवस्था म्हणजे काही कॉमेडी सर्कस नाही. अशा प्रकारच्या टीका करण्यापेक्षा अर्थव्यवस्था सुधारा असे प्रियंका म्हणाल्या.

नेमके काय म्हणाल्या प्रियंका गांधी

भाजप नेत्यांना त्यांचे काम करण्याऐवजी इतरांनी जे काही साध्य केले आहे ते नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. नोबेल विजेते बॅनर्जी यांनी त्यांचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले म्हणून त्यांना नोबेल मिळाले. सध्या अर्थव्यवस्थेची वाट लागली असून ती पूर्णपणे डळमळीत झाली आहे. ही अर्थव्यवस्था सुधारणे तुमचे काम आहे. हे काम करण्याऐवजी कॉमेडी सर्कस चालवू नका.

आपली प्रतिक्रिया द्या