
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रसरकारवर टीका केली आहे. सय्यद मुश्ताक ट्रॉफी सामन्यातील एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण करताना एक खेळाडू उत्तमप्रकारे कॅच पकडताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे, उत्तमप्रकारे झेल टिपण्यासाठी शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवणे गरजेचे असते. तसेच खिलाडूपणाची भावना सर्वात महत्त्वाची असते. गुरुत्वाकर्षण, गणीताची समीकरणे,ओला-उबर आणि इतर गोष्टींना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हा संदेश लिहून सर्वात शेवटी त्यांनी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेबाबत जनहितार्थ जारी असे म्हणत सरकारला टोला लगावला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अर्थव्यवस्थेबाबत नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रियांवरून प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कोणत्याही गणीताची किंवा कोणत्याही आकडेवारीची गरज नाही. आइन्साईन आकडेवारीत अडकला असता, तर तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून शकला नसता, असेही गोयल यांनी म्हटले आहे. या वक्तव्यावरून ट्रोल झाल्यानंतर आपल्या वक्तव्यातील अर्थ लक्षात न घेता टीका होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर ऑटो सेक्टरमधील मंदी ओला- उबरमुळे आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्यांवरून प्रियंका यांनी व्हिडिओ ट्विट करत टीका केली आहे. प्रियंका यांनी शेअर केलेला व्हिडिओ मार्चमधील असून सय्यद मुश्ताक ट्रॉफीत महाराष्ट्र आणि रल्वे संघात झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने पकडलेला उत्तम झेल व्हिडिओत दिसत आहे. अर्थव्यवस्थेसह प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवरही टीका केली आहे. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यावरून त्यांनी योगी सरकारवर टीकेची झोड उठवली.




























































