Pro Kabaddi League : प्रो कबड्डीच्या 10व्या पर्वातील बाद फेरीला सोमवारपासून सुरुवात

12 आठवड्यांच्या तीव्र स्पर्धेनंतर अव्वल सहा संघ प्रो कबड्डी लीगच्या 10व्या पर्वातील बाद फेरीसाठी सज्ज झाले आहेत. लीगच्या प्ले ऑफ लढतींना 26 फेब्रुवारीपासून हैदराबाद येथील गच्चीबौली येथील जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात सुरवात होणार आहे.

तिसऱ्या क्रमांकावरील दबंगी दिल्ली के.सी. संघ सहाव्या क्रमांकावरील पाटणा पायरटस संघाशी पहिल्या एलिमेनेटर लढतीत खेळेल. दरम्यान, चौथ्या स्थानावरील गुजरात जाएंटस संघ एलिमिनेटरच्या दुसऱ्या लढतीत हरयाना स्टिलर्स संघाशी खेळेल. या लढतीतील दोन्ही विजयी संघ उपांत्य फेरीत खेळतील. उपांत्य फेरीतील लढती 28 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत.

गुणतक्त्यात आघाडीवर असलेले पुणेरी पलटण आणि दुसऱ्या क्रमांकावरील जयपूर पिंक पॅंथर्स संघांनी थेट उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या एलिमिनेटरमधील विजेता संघ पहिल्या उपांत्य फेरीत पुणेरी पलटण संघाशी खेळेल. दुसऱ्या एलिमिनेटरमधील विजेता संघ दुसऱ्या उपांत्य फेरीत जयपूर पिंक पॅंथर्सशी खेळेल. अंतिम सामना 1 मार्च रोजी खेळविला जाणार आहे.